पूर्वलक्षी प्रभावाने द्या शिक्षकांना पदोन्नती

महाराष्ट्र टाइम्स
demand for promotion for teachers retrospective salary increase and retirement pension revision
नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी पदांचे २०१४पासून नियमबाह्य पद्धतीने विलिनीकरण करण्यात आल्याने अनेक पात्र शिक्षक पदोन्नतीपासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रक्रियेमुळे नुकसान झालेल्या पात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नती, वेतनवाढ आणि निवृत्तीवेतनाचे पुनर्निर्धारण द्यावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी पदे २०१४ पासून श्रेणी-२ मध्ये विलीन करण्यात आली. त्यानंतर ही पदे श्रेणी-३ ऐवजी थेट श्रेणी-२ म्हणून पदोन्नतीने भरली गेली. या प्रक्रियेमुळे सेवाज्येष्ठतेनुसार हक्क असलेले प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि केंद्रप्रमुख पदोन्नतीपासून वंचित राहिले. परिणामी, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन, निवृत्तीवेतन आणि इतर सेवानिवृत्ती लाभांवर परिणाम झाल्याचे निवेदनात नमूद आहे. या विलीनीकरणाची कायदेशीरता तपासावी, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे राज्य सरचिटणीस तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पात्र शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि केंद्रप्रमुखांना पूर्वलक्षी प्रभावाने नाममात्र पदोन्नती मंजूर करावी. प्रत्येक पात्र कर्मचाऱ्यास किमान एक वेतनवाढ देऊन वेतननिश्चिती करावी. तसेच अन्यायग्रस्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन, उपदान आणि इतर लाभांचे तातडीने पुनर्निर्धारण करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.