Fear Of Legal Action Leads Stunt Performers To School By The Police Commissioner
स्टंट करणाऱ्यांची घेतली ‘शाळा’
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मद्यप्राशन करून भरधाव कार चालवून धोकादायक स्टंट करणाऱ्या पाच तरुणांची पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘शाळा’ घेतली. डेक्कन जिमखाना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तरुणांना गुरुवारी सकाळी पोलिस आयुक्तांनी त्यांना समज दिली. मद्यपान करून वाहन चालविल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईची जाणीव करून देऊन त्यांनी यापुढे असे प्रकार न करण्याचा सल्ला दिला.
रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत सेनापती बापट रस्ता आणि लॉ कॉलेज रस्त्यावर पाच तरुणांनी मद्यप्राशन करून कार चालविली. भरधाव कारमधून धोकादायक स्टंट करताना त्यांनी स्वतःसह रस्त्यावरील अन्य वाहनचालकांचा जीव धोक्यात घातला. या प्रकरणी डेक्कन जिमखाना पोलिसांनी पाचही तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यांचे वय २२ ते २४ वर्षे असून, ते शहरातील विविध नामांकित महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत. पोलिसांनी त्यांची कार जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महर्षीनगर आणि सहकारनगर परिसरातील हे तरुण शहरात एका ठिकाणी मद्यप्राशन केल्यानंतर कारमधून सेनापती बापट रस्ता आणि लॉ कॉलेज रस्त्यावर गेले. त्यांनी भरधाव वेगाने वाहन चालविताना मागील खिडक्यांमधून शरीर बाहेर काढले. काही जण कारच्या छताला लटकले होते. हातात बिअर आणि मद्याच्या बाटल्या घेऊन आरडाओरड करीत स्टंट केले. या प्रकाराचे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी कार जप्त करून पाचही तरुणांना ताब्यात घेतले. स्वतःचा आणि अन्य वाहनचालकांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. डेक्कन पोलिसांनी सांगितले, की पाच तरुणांपैकी दोघे सधन कुटुंबातील आहेत, तर अन्य तिघांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यापैकी एका तरुणाची आई घरकाम करते, तर काही काळापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.
गुरुवारी सकाळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी तरुण आणि त्यांच्या पालकांना कार्यालयात बोलावून समुपदेशन केले. मद्यपान करून वाहन चालविण्याचे धोके, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणारी कारवाई आणि भविष्यातील परिणाम त्यांनी समजावून सांगितले. शिक्षणावर लक्ष केंद्रित करून अशा प्रकारांपासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. यापुढे वाहतूक नियमांचे पालन करू आणि मद्यपान करणार नाही, असे आश्वासन या तरुणांनी पोलिस आयुक्तांना दिले.