Indigos Airbus A320 Neo Aircraft Departs For Istanbul
सतरा महिन्यांनंतर विमान इस्तंबूलकडे
महाराष्ट्र टाइम्स•
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या सतरा महिन्यांपासून उभे असलेले इंडिगोचे एअरबस ए-३२० नीओ विमान अखेर नागपूरहून इस्तंबूलकडे रवाना झाले. तब्बल दीड वर्षांच्या थांब्यानंतर हे विमान आता तुर्कियेतील एजेट एअरलाइनच्या ताफ्यात सेवा देणार आहे.
सुमारे सात वर्षे जुने असलेले हे विमान इंडिगोने २०१९मध्ये आपल्या ताफ्यात घेतले होते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर सेवा दिल्यानंतर मार्च २०२५मध्ये ते नागपूरला आणण्यात आले. तेव्हापासून हे विमान एएआर इंडामर टेक्निक्सच्या एमआरओमध्ये दुरुस्ती व देखभालीसाठी उभे होते. व्हीटी-आयजेई नोंदणी क्रमांकाचे हे विमान प्रॅट अँड व्हिटनी इंजिनद्वारे संचालित ए-३२० नीओ श्रेणीतील आहे. या इंजिनमधील तांत्रिक त्रुटींमुळे गेल्या काही वर्षांत इंडिगोसह अनेक एअरलाइन्सची विमाने दीर्घकाळ जमिनीवर ठेवावी लागली होती. मात्र, हे विमान ताफ्यातून बाजूला करण्यामागे इंजिनची समस्या होती का, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. नागपूरच्या धावपट्टीवर दीर्घकाळ विसावलेले हे विमान आता तुर्कियेच्या आकाशात प्रवासीसेवा देताना दिसणार आहे.