२१६ स्टार कासवांचे ‘ताडोब्या’मध्ये पुनर्वसन

महाराष्ट्र टाइम्स
successful rehabilitation of 216 indian star turtles in tadoba
मुंबई आणि ठाणे परिसरातून तस्करीच्या कारवायांमध्ये जप्त तसेच विविध ठिकाणी बचाव करण्यात आलेल्या २१६ भारतीय स्टार कासवांना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या मोहिमेद्वारे वन विभाग आणि रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) यांच्या ‘प्रोजेक्ट स्ट्राइप्स’चा प्रारंभ करण्यात आला.

मुंबई आणि ठाणे परिसरात बेकायदा वन्यजीव तस्करीविरोधातील कारवाईत तसेच बचाव मोहिमांमध्ये ही कासवे ताब्यात आली होती. त्यापैकी १५० कासवांची ‘रॉ’कडून देखभाल व पुनर्वसन करण्यात आले होते. उर्वरित कासव ठाणे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर, पॉज, डब्ल्यूएए यांच्या देखरेखीखाली होती.
वन विभाग आणि ‘रॉ’च्या वन्यजीव तज्ज्ञांचा समावेश असलेल्या १० सदस्यीय पथकाने ही मोहीम राबवली. सुमारे ८०० किलोमीटरचा प्रवास विशेष वन्यजीव रुग्णवाहिकेतून करण्यात आला. कासवांना हवेशीर, योग्य सुविधा असलेल्या वाहकांमधून नेण्यात आले.