Bjp Holds Strategy Meeting For Elections In Seven States
सात राज्यांसाठी रणनीती बैठक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी रविवारी पक्षाचे पदाधिकारी, राज्याध्यक्ष आणि राज्य प्रभारी यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. उत्तर प्रदेश, गुजरातसह पुढील वर्षी निवडणुका होणाऱ्या सात राज्यांतील रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्क वाढवण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजप मुख्यालयात झालेल्या या बैठकीला पक्षाचे नव्याने नियुक्त राष्ट्रीय पदाधिकारी, विविध राज्य शाखांचे अध्यक्ष, राज्य प्रभारी आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री संघटन बी. एल. संतोष हेदेखील बैठकीला उपस्थित होते. निवडणुका होणाऱ्या राज्यांत तळागाळातील संपर्क अधिक मजबूत करणे, युवकांपर्यंत पोहोच वाढवणे आणि बूथस्तरावरील संघटना अधिक सक्रिय करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. मात्र, या बैठकीबाबत भाजपकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये २०२७मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी पंजाब आणि हिमाचल प्रदेश वगळता इतर राज्यांत भाजप सत्तेत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे, तर हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार आहे.
‘पुढील निवडणुकांसाठी पक्षाची तयारी आणि रणनीती यावर चर्चा करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक होती. त्यासोबतच विविध संघटनात्मक मुद्द्यांवरही विचारमंथन झाले,’ असे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी शनिवारी नवीन यांनी पक्षाच्या नव्याने नियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीला भाजपच्या राष्ट्रीय चमूमधील माजी पदाधिकारीही उपस्थित होते. त्याच दिवशी झालेल्या आणखी एका बैठकीत राज्य शाखांचे अध्यक्ष आणि संघटन सचिव सहभागी झाले होते. शनिवारी दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजप मुख्यालयाला भेट दिली. त्यांनी पक्षाच्या ६७ नव्याने नियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ही बैठक पाच तासांहून अधिक काळ चालली.