Wild Boars Devastate Farmers Crops Significant Losses In Verul
रानडुकरांनी फस्त केले मक्याचे पीक
Contributed by: शेतकरी|महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
वेरूळ परिसरातील शेतकऱ्यांच्या मका पिकांचे रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वेरूळ येथील गट नंबर ४०९ मध्ये शेतकरी नईम शेख यांच्या शेतातील सुमारे एक एकर क्षेत्रावरील मका रानडुकरांनी फस्त करून टाकला. मका पिकांचे नुकसान करत अक्षरशः मका भुईसपाट केला आहे.
शेतकरी नईम शेख ‘मटा’शी बोलताना म्हणाले, ‘दोन एकर शेती असून, त्यापैकी एका एकरावर त्यांनी मक्याची लागवड केली होती. पिकाची लागवड, मशागत, बियाणे, खते, औषधे फवारणी यावर सर्व खर्च मिळून आतापर्यंत ३० हजारांपेक्षा अधिक खर्च झाला आहे. मक्याला चांगली कणसे फुटली होती. मका काढणीला आल्यानंतर साधारण ८० ते ९० हजारांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता होती. मात्र काढणीच्या तोंडावर रानडुकरांनी संपूर्ण पीक उद्ध्वस्त करून मोठे आर्थिक नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.’भटक्या कुत्र्यांचाही मोठा उपद्रव
वेरूळ गाव परिसरामध्ये रानडुकरांचा, मोकाट भटक्या कुत्र्यांचा वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यांचा बंदोबस्त वन विभागाने करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. रानडुकरांमुळे शेतकऱ्यांचे पिकांच्या अतोनात नुकसान होत आहे. मोकाट कुत्र्यांमुळे स्थानिक नागरिकांसह भाविक, पर्यटक भयभीत झालेले आहेत. वेरूळ परिसरामध्ये रानडुकरांचा, मोकाट भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रानडुकरांकडून शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान केले जात आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसापूर्वी वेरूळ परिसरातील एका लहान बालकाला कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली होती तर एका बालकाचा कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता. ग्रामपंचायतीने; तसेच प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी. रानडुकरांचा व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सतीश लोखंडे यांनी केली आहे.