बीड जिल्ह्यात पाऊस गायब

महाराष्ट्र टाइम्स
बीड जिल्ह्यात पाऊस गायब
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वीस दिवसांपासून अनेक भागांत पावसाचा खंड पडला आहे. पावसाळ्याचे जवळपास पावणेतीन महिने झाले तरी सरासरीच्या ५० टक्केही पाऊस जिल्ह्यात पडलेला नाही. त्यामुळे या वर्षी पावसाने शेतकऱ्याच्या पुढे दुष्काळी संकट उभे ठाकले आहे. बीड जिल्ह्यात खरिपाच्या सात लाख ६१ हजार ३५७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अनेक ठिकाणी पेरणी पुरता पाऊस पडला आहे. त्यानंतर पावसाने मोठी दडी मारली आहे. मात्र, या सात लाखाहून अधिक क्षेत्रातील बहुतांश पिके सद्यस्थितीत अडचणीत सापडले आहे. सर्व पिके वाढीच्या ते फुलोरा लागण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र, मागील दोन आठवड्यांत पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे; तर काही ठिकाणी पिके करपू लागली आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन पिकाचे क्षेत्र आहे. सोयाबीन पिकाचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र तीन लाख दोन हजार ६५२ हेक्टर आहे. त्या तुलनेत तीन लाख ९५ हजार ६४७ हेक्टर क्षेत्रावर रेकॉर्ड ब्रेक पेरणी झाली आहे. ही पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या १३० टक्के आहे. प्राप्त पीक परिस्थितीनुसार पीक सध्या फुलोरा अवस्थेत येत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी काही ठिकाणी सद्यस्थितीत कमी पावसामुळे पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात खुंटली असून, यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्याची वार्षिक पावसाची सरासरी ही ५६६ मिलिमीटर आहे. त्या तुलनेत आत्तापर्यंत पावणेतीन महिन्यात केवळ ४८ टक्के म्हणजेच २७४ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. गेल्या वीस दिवसा असून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा खंड आहे त्यामुळे फुलराणी शेंगा लागण्याची अवस्थेत असलेले सोयाबीन सुकू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात पावसाचे चार महिन्यापैकी तीन महिने होत असले तरी निम्मा ही पाऊस न झाल्याने दुष्काळी संकट निर्माण झाले आहे.