एक तरी पतसंस्था चालवून दाखवा

महाराष्ट्र टाइम्स
heavy announcements of strength in latur district cooperative bank elections
‘तुम्ही जी काही सत्ता आणि ताकद आमच्या हाती दिली, त्याचा पूर्ण उपयोग फक्त तुमच्या कल्याणासाठी व सुखासाठी करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. जे लोक केवळ टीका करतात, त्यांनी तुमची एखादी पतसंस्था तरी यशस्वीपणे चालवून दाखवावी आणि मग आमच्याकडे बोट दाखवावे. त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला सारावं आणि बँकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,’ असे प्रतिपादन लातूर जिल्हा सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक दिलीप देशमुख यांनी केले आहे. त्यामुळे लातूर जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल सत्ताधारी देशमुख गटानी वाजवला असून, विरोधकांना खुले आव्हान दिले आहे, अशी चर्चा होत आहे.

‘महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि मी स्वतः १९८७ मध्ये या बँकेवर संचालक म्हणून आलो. पूर्ण ताकदीने उभी राहिलेली ही बँक आज गेल्या ४० वर्षांमध्ये केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकाची बँक म्हणून नावारूपाला आली आहे. हे यश आपल्या सगळ्यांच्या कष्टामुळेच शक्य झाले,’ असेही त्यांनी सांगितले.
सभेत सभासदांना व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या विविध घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. यामध्ये नव्या शेतकरी सभासदांना कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच ‘शुभभमंगल योजने’तून शून्य व्याजाने कर्ज देण्याची घोषणा करून, या योजनेतील कर्ज रक्कमेत वाढ करण्याचेही आश्वासन देण्यात आले. बँकेशी जोडलेल्या प्रत्येक सोसायटी कार्यालयाला एक टीव्ही सेट भेट देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. बँक कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस देण्याची आणि मूळ पगारामध्ये १० टक्के वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच, गटसचिवांना २५ टक्क्यांचा बोनस देण्याची घोषणा या वेळी करण्यात आली

‘विरोधक नेहमी केवळ वेगवेगळ्या कारणावरून राजकीय आरोप करतात आणि नंतर पळ काढतात. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय असे बिनबुडाचे आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आणि बेजबाबदारपणाचे आहे,’ अशा शब्दांत बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

‘मला बँकेचा व्हाइस चेअरमन, चेअरमन म्हणून काम करता आले. त्यांच्या याच पाठबळामुळे आज मला राज्याचा सहकार मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

मी आणि दिलीपराव या बँकेचे मायबाप आहोत. आम्ही दोघेही आयुष्यभर या बँकेसोबत आणि शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे राहणार असून, हे सहकाराचे भांडवल कधीही सोडणार नाही,’ अशी ग्वाही सहकार मंत्री बँकेचे जेष्ठ संचालक बाबासाहेब पाटील यांनी वेळी दिली.

सभेच्या शेवटी बँकेचे व्हाइस चेअरमन प्रमोद जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.