काँग्रेस घेणार उभारी

महाराष्ट्र टाइम्स
काँग्रेस घेणार उभारी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिबिराच्या समारोप सोहळ्यात मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय वॉररूमचे अध्यक्ष शशिकांत सेंथिल, प्रदेशाध्यक्ष रवींद्र सपकाळ यांच्यासह वरिष्ठ नेते विविध सत्रांमध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. राहुल गांधींच्या आगमनापूर्वी शिबिरार्थींना जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक दिवस मुक्काम करून गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा व त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा विशेष टास्क देण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थी मनरेगा अंतर्गत कामाचा प्रत्यक्ष अनुभव आणि श्रमदानात सहभाग घेणार आहेत.

आगामी काळातील राजकीय आणि संघटनात्मक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेसने नाशिकमध्ये दहा दिवसांचे राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सहभागाने होणाऱ्या या शिबिराला आज, सोमवारपासून सुरुवात होईल. बुधवारी, २ सप्टेंबरला पक्षाचे शीर्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा समारोप होईल.
गंगापूर धरणालगत ‘एमटीडीसी’च्या ‘ग्रेप पार्क’ रीसॉर्टमध्ये हे शिबिर होणार आहे. रविवारी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिबिराच्या नियोजनाला व तयारीला अंतिम रूप दिले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव रेहाना चिश्ती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, भारत पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष नीलेश खैरे, जिल्हा काँग्रेस दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, जयेश पोकळे, जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी रविवारी प्रशिक्षणस्थळी पाहणी करून तयारीवर अखेरचा हात फिरविला. शिबिरात काँग्रेसची विचारधारा, देशाच्या राजकारणातील पक्षाची भूमिका, आगामी काळातील पक्षाची दिशा व रणनीती, संघटनात्मक तयारी आणि पक्षासमोरील राजकीय आव्हाने यावर सविस्तर चर्चा होणार आहे. नव्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, प्रश्न आणि राजकीय दृष्टिकोन यांनाही प्रशिक्षणामध्ये विशेष महत्त्व दिले जाणार आहे. हे बंदिस्त शिबिर निमंत्रित पदाधिकाऱ्यांसाठीच असून, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील नेते या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकाऱ्यांसाठी ग्रामीण भागात मुक्काम व मनरेगाच्या अनुभवाचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.