Delhi Police Given Guidelines To Maintain Calm During Protests
आंदोलनांदरम्यान संयम बाळगा
Contributed by: नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
आंदोलनांदरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांनी संयम राखावा, चिथावणीला बळी पडू नये आणि आंदोलकांकडून मोबाइल चित्रीकरणाद्वारे दलाची प्रतिमा मलिन होईल अशी कोणतीही कृती टाळावी, अशा नव्या मार्गदर्शक सूचना दिल्ली पोलिसांना केंद्रीय यंत्रणेने जारी केल्या आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी रविवारी दिली.
गेल्या महिन्यात जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनावेळी पोलिसांकडून अतिरेक झाल्याचे आरोप झाले होते. त्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘तुमचा राग हीच त्यांची समाधानाची बाब आणि तुम्हाला खलनायक म्हणून दाखवण्यासाठीची सामग्री ठरते’, असे सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.पोलिसांनी आंदोलनस्थळी आपली प्रत्येक कृती मोबाइलवर रेकॉर्ड होत आहे आणि ती नंतर ऑनलाइन प्रसारित होऊ शकते, असे गृहित धरावे, असेही सांगण्यात आले आहे. गर्दी नियंत्रणाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना शांत देहबोली आणि आदरयुक्त भाषा राखण्यावर भर देण्यात आला आहे.