...तरीही नागरिकतेचा पुरावा मागितला

Contributed byनवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
...तरीही नागरिकतेचा पुरावा मागितला
मतदारयादीच्या विशेष पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेत मतदारांची नावे वगळली जाणे आणि नोंदींमध्ये त्रुटी आढळण्याच्या घटना समोर येत आहेत. यातच आता संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्तसह विविध देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून सेवा बजावलेल्या एका माजी वरिष्ठ राजदूतालाही या समस्येचा सामना करावा लागला आहे. तीन देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतरही नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी ‘नमूद नसलेली कागदपत्रे’ मागितली जात असल्याचे सांगून त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारताचे माजी राजदूत नवदीप सुरी यांनी ‘एक्स’वर पंजाबमधील त्यांचा कटू अनुभव सांगितला आहे. सुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी स्थानिक बीएलओकडे जाऊन मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड सादर केले होते. त्या वेळी माहिती योग्य असल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र, २००३च्या एसआयआर यादीतील माहितीशी त्यांच्या नोंदी जुळत नसल्याचा संदेश स्वयंसेवकाकडून त्यांना प्राप्त झाला.