ड्रग्ज तस्कर वीरेंदर सिंग भारताच्या ताब्यात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
ड्रग्ज तस्कर वीरेंदर सिंग भारताच्या ताब्यात
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर वीरेंदर सिंग बसोया भारताच्या ताब्यात आला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिली. संयुक्त अरब अमिरातीतून (यूएई) प्रत्यार्पण झाल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) वीरेंदरला भारतात आणले, असे शहा यांनी सांगितले. त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यासाठी दिल्ली न्यायालयाने तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला

‘मोदी सरकार विदेशात लपलेल्या अमली पदार्थ तस्करांचा सातत्याने माग काढत असून, त्यांच्या संपूर्ण जाळ्याचा नायनाट करत आहे. अमली पदार्थांविरोधातील शून्य सहनशीलतेच्या धोरणात ‘एनसीबी’ने नवा मैलाचा दगड गाठला आहे. तस्कर कुठेही लपले, तरी ते भारतीय कायद्याच्या तडाख्यातून सुटू शकत नाहीत,’ असे शहा यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुण्यात २०२४मध्ये ५०० ग्रॅम मेफेड्रोन जप्तीच्या प्रकरणात वीरेंदरचे नाव समोर आले होते. पुढील तपासात पुण्यातून सुमारे ८६७ किलो आणि दिल्लीतून ९७० किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. एकूण जप्ती सुमारे एक हजार ८३७ किलोपर्यंत पोहोचली. ‘म्याव म्याव’ म्हणून ओळखले जाणारे मेफेड्रोन हे कृत्रिम उत्तेजक आहे.