हेलपाटा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
हेलपाटा
खाद्या गोष्टीसाठी उगाचच पुन:पुन्हा खेपा माराव्या लागल्या की माणूस वैतागतो अन् म्हणतो, ‘उगाच ‘हेलपाटे’ घालतोय एवढ्याशा कामासाठी!’ एखाद्या कामासाठी किंवा भेटीसाठी वारंवार जावं लागतं, पण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही, याला म्हणायचं हेलपाटा. व्यर्थ फेरा, फुकटची खेप किंवा व्यर्थ येरझारा असे ‘हेलपाटा’चे अर्थ शब्दकोश सांगतो. ‘फ्रुटलेस’ किंवा ‘वेस्टेड ट्रिप’ असा इंग्रजीत जवळ जाणारा अर्थ सांगता येईल, पण हेलपाटामधली चिडचिड, मनस्ताप, वैताग यात नाही. हिंदीतला ‘निष्फल यात्रा’ तर उगाच पारमार्थिक वाटतो! हेलपाटा म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पुन:पुन्हा मारलेली निष्फळ फेरी तर आहेच; पण थकवणारी पायपीटही आहे. एखाद्याला हेलपाटे मारायला लावण्यात पुष्कळदा पदाचा गर्व असतो आणि अक्कल नसलेल्या गरजवंताला छळण्याची मानसिकता. आपलं स्थानमाहात्म्य ठसवण्यासाठी अनेकांना हा सोपा मार्ग वाटतो किंवा तो ‘अर्थपूर्ण’ संदेशही असतो. हा शब्द अगदी अस्सल मराठी मातीतून उगवला आहे, म्हणजे त्याचं मूळ अन्य कोणत्याही भाषेत सापडत नाही. महाराष्ट्रातलं लोकजीवन आणि स्थानिक बोलीभाषेतून हा शब्द रुजला. ‘हेलपाटा’ मधला ‘हेल’ हा हेलकाव्याशी संबधित आहे. हेलकावे खाणारी एखादी वस्तू जशी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात राहते, तसं हेलपाटे घालणाऱ्याचं होतं. ‘हेलपाटे’ आपल्याला अजिबातच नवे नाहीत. ते पडू नयेत म्हणून मायबाप सरकारने अनेक ठिकाणी ‘एक खिडकी’ योजना आणल्या, आता ती एकुलती एक खिडकीच बंद असेल तर हेलपाटे पडणारच की! तुम्ही म्हणाल ‘डिजिटल झालं आता सगळं,’ पण तिथं सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारींनी सगळा ‘सेतू’च कोलमडतो अन् हेलपाटा चुकत नाही! काही कामानिमित्त हेलपाटे घालणं एक वेळ ठीक; पण कामशिवाय हेलपाटे घालणारेही असतात बरं. त्यांच्यासाठी मराठीत मस्त म्हण आहे. ‘गाढव मेलं ओझ्यानं अन् शिंगरू मेलं हेलपाट्यानं.’ मंडळी, माणसाचं ओझ्यानं गाढव तर होऊ नयेच, पण रिकामे हेलपाटेही वाईटच... काय?

हेलपाटा



हेलपाटा