स्थलकालातीत रामकथा

Contributed byप्रसाद फाटक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
स्थलकालातीत रामकथा
रतासह अनेक देशांना शतकानुशतके मोहून टाकणारे महाकाव्य म्हणजे रामायण ! अफगाणिस्तानपासून इंडोनेशिया, जपानपर्यंतच्या मोठ्या जनसमुदायाने रामायण नुसते स्वीकारलेच नाही तर श्रद्धापूर्वक जपले आहे. अनेक देशांनी नाणी, पोस्टाची तिकिटे यांवरही रामायणातील प्रसंगांना मानाचे स्थान दिले आहे. साहित्य आणि विविध कलांच्या माध्यमातून जगभर पोहोचलेल्या या अजरामर कलाकृतीच्या विश्वसंचाराचा वेध भारतीय कला-संस्कृतीच्या अभ्यासक दीपाली पाटवदकर यांनी आपल्या ‘द एपिक फूटप्रिंट : रामायण बियाँड बॉर्डर्स’ या पुस्तकाच्या माध्यमातून घेतला आहे.

पुस्तकाचे तीन विभाग आहेत. पहिला विभाग आहे ‘साहित्यातील रामायण’. रामायणाचा भारतात जन्मलेल्या सर्व पंथ आणि धर्मांनी रामायणातील संदेश आत्मसात केला आहे. येथील सर्व प्रमुख भाषांमध्ये रामायण लिहिले गेले आहेत. बौद्ध साहित्यातील जातक कथांमध्ये रामकथेतील पात्रांचे संदर्भ आलेले आहेत. प्राकृत, तसेच कन्नड भाषेमध्ये जैन मुनींनी रामकथा लिहिलेल्या आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे अहिंसा तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या या जैन आणि बौद्ध रामकथांमधला राम अहिंसक आहे आणि तो वध करत नाही. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबमध्येही ‘राम अवतार’ या नावाने रामकथा आली आहे. गोंड, संथालांपासून ते अगदी मिझोराम आणि अरुणाचल येथील वनवासी समाजामध्येही रामसंदेश किती खोलवर रुजला आहे हे पाहून थक्क व्हायला होते. रामायणावर भाष्य करणारे साहित्य कोणते, याचाही या विभागात परामर्श घेतला गेला आहे .
चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, कठपुतळी, संगीत, गायन अशा पारंपरिक कलांपासून छायाचित्रण, ॲनिमेशनसारख्या आधुनिक तंत्रकलाप्रकारांमधून श्रीरामाची कथा समाजजीवनाच्या अंगप्रत्यंगाला कशी भिडली, याचे पुस्तकाच्या दुसऱ्या विभागातले सचित्र दर्शन स्तिमित करणारे आहे. तिसऱ्या विभागात रामायण ही सांस्कृतिक जीवनरेखा कशी झाली आहे हे अनेक उदाहरणांसह दाखवून दिले आहे. यासोबतच रामाशी संबंधित तीर्थक्षेत्रे, रामायणापासून स्फूर्ती घेतलेले राजे यांचीही माहिती मिळते.

वेगवेगळ्या रामायणांमधल्या अनेक रंजक गोष्टीही आपल्याला कळतात. उदा. (१) वाल्मिकी रामायणाच्या दर हजाराव्या श्लोकाचे पहिले अक्षर घेतले तर गायत्री मंत्र तयार होतो. (२) रामरक्षास्तोत्रात रामासाठी वापरलेल्या विविध नावांचा आणि विशेषणांचा क्रम पाहिला तर तो रामाच्या जीवनाचा प्रवास सांगतो. म्हणजे, पहिल्या श्लोकात त्याला राघव (रघुकुलात जन्म झालेला) म्हटले आहे; तर शेवटच्या श्लोकात दशमुखान्तक (दशानन रावणाला संपवणारा) म्हटले आहे.

रामायणाने वेगवेगळ्या कालखंडात समाजाला उभारी दिली. विविध बादशाह्यांच्या वरवंट्याखाली भरडल्या गेलेल्या समाजाला मानसिक आधार देण्यासाठी उत्तरेत संत तुलसीदासांनी, महाराष्ट्रात संत एकनाथांनी, समर्थ रामदासांनी रामविचारांचा प्रसार केला. श्रीरामाची कथा ऐकून लोकांची धर्मावरची श्रद्धा पुन्हा बळकट व्हायला मदत झालीच, पण दुर्जनांच्या नाशासाठी शस्त्र हाती घ्यावेच लागते हाही संदेश समाजात गेला. पुढे अठराव्या शतकात भारतातून वेस्ट इंडिज, फिजी, गयाना इत्यादी देशांमध्ये मजूर म्हणून नेलेल्या भारतीयांचे इंग्रजांकडून अपरिमित शोषण झाले. अशा लोकांचे मनोबल राखण्यात रामायणाने मोठी भूमिका बजावली. स्वातंत्र्यलढ्यातही समाजाला एकतेच्या धाग्यामध्ये गुंफण्यासाठी गांधीजींनी वापरलेले भजन होते ‘रघुपती राघव’! या सगळ्या उदाहरणांमधून लेखिकेने रामायणाची प्रासंगिकता अधोरेखित केली आहे.

पुस्तकाच्या शेवटी दिलेली इ. स. पूर्व काळापासून ते एकविसाव्या शतकापर्यंतच्या प्रत्येक शतकात लिहिल्या गेलेल्या दीडशे रामायणांची सूची; जगाच्या कोणत्या भागात कोणते रामायण लिहिले गेले आणि कोणत्या कलेच्या माध्यमातून रामायण सादर झाले याचे नकाशे यांमुळे पुस्तकाचे मूल्य वृद्धिंगत झाले आहे. लेखिकेनेच केलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावट लक्षवेधी आहे. रामायणाच्या एवढ्या पैलूंचा वेध घेणारे हे पुस्तक रंगीत स्वरूपात आल्यास त्याची परिणामकारकता द्विगुणित होईल.

रामायणाचा हा दिग्विजय तलवारीच्या बळावर न होता फक्त शांततामय मार्गाने झालेला आहे, ही गोष्ट भारतीय संस्कृतीविषयी खूप काही सांगून जाते. भाषा-पंथ-स्थानानुसार रामकथेचे तपशील बदलले तरी त्याचा गाभा बदलला नाही. ‘सत्शील राम’ आणि ‘दुर्जन रावण’ हे सूत्र समान आहे. खुद्द श्रीलंकेतही राम आणि बिभीषण पूज्य आहेत. आपल्या देशात मात्र अलीकडे रावणाला नायक म्हणून प्रस्थापित करून वातावरण गढूळ प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत या पुस्तकाचे मोल विशेष आहे.

--------------------------------------

द एपिक फूटप्रिंट : रामायण बियाँड बॉर्डर्स

लेखिका : दीपाली पाटवदकर

प्रकाशक : नोशन प्रेस

पाने : २७६,   किंमत : ३८०