Uttarakhand Tunnel Accident Seven Dead Three Missing
उत्तराखंडमधील बोगदा दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी माती हटवण्यासाठी यंत्रे तैनात करण्यात आली असून, बोगद्यातील पाणी बाहेर काढण्याचे कामही सुरू आहे. मात्र, परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात जलविद्युत प्रकल्पासाठी बांधण्यात येत असलेल्या बोगद्यात माती आणि पाण्याचा लोंढा घुसल्याने सात कामगारांचा मृत्यू झाला असून, तीन कामगार बेपत्ता आहेत. बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह (एनडीआरएफ) विविध बचाव पथकांकडून शुक्रवारपासून युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे.‘गुरुवारी रात्री सुमारे ७ वाजता बोगद्यात अचानक पाणी घुसले. सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या या बोगद्यात त्यावेळी २२ कामगार अडकले होते,’ असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. के. जोशी यांनी सांगितले. मायापूर (पिपलकोटी) येथे टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (टीएचडीसी) विष्णुगाड-पिपलकोटी जलविद्युत प्रकल्पात ही दुर्घटना घडली. भूस्खलन आणि जमिनीचा काही भाग खचल्याने बोगद्याचा सुमारे निम्मा भाग माती आणि पाण्याने भरला त्यात कामगार अडकले.
राज्य आपत्कालीन संचालन केंद्राच्या शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, गुरुवारी रात्रभर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान १९ कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यात आले. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. उर्वरित तीन कामगार बोगद्याच्या आत सुमारे १.८ किलोमीटर अंतरावर अडकले असावेत, असा प्रशासनाचा अंदाज आहे. जखमी कामगारांवर गोपेश्वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एनडीआरएफ, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), भारत-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी), पोलिस तसेच तांत्रिक आणि विशेष बचाव पथके या मोहिमेत सहभागी आहेत. बोगद्यात मोठ्या प्रमाणात माती आणि पाणी असल्याने अत्यंत सावधगिरीने आणि समन्वयाने बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शुक्रवारी पिपलकोटी येथे जाऊन बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांनी चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार आणि पोलिस अधीक्षक सुरजीत सिंह पनवार यांच्याकडून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच बोगद्यात जाऊन विविध बचाव पथकांकडून परिस्थितीची माहिती घेतली.