नागपूर शहरात अनेक ज्येष्ठ नागरिक विविध समस्यांशी झुंज देत आहेत. माहितीच्या अभावामुळे अनेकदा शेजारी, समाज, पोलिस किंवा प्रशासनाकडून त्यांना वेळेत मदत मिळत नाही. त्यामुळे काही वेळा ज्येष्ठांचा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनाही घडतात. वृत्तपत्रांमधून समोर येणाऱ्या अशा घटना मन सुन्न करणाऱ्या असतात.ही गंभीर बाब लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तसेच महाराष्ट्र शासनाच्या ९ जुलै २०१८च्या निर्णयाच्या आधारे ही संकल्पना राबवली जात आहे. सुरेश रेवतकर आणि रमेश सातपुते यांच्या सहकार्याने हा प्रकल्प अंमलात आणला जाणार आहे.
कोणत्याही वयोगटातील महिला, पुरुष, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त व्यक्ती या उपक्रमात मोफत सेवेसाठी सहभागी होऊ शकतात. विशेषतः डॉक्टर व आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवक, वकील किंवा कायदेतज्ज्ञ, आजी-माजी पोलिस आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी ‘वृद्ध मित्र’ म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा उपक्रम नागपूर शहरातील दक्षिण, दक्षिण-पश्चिम, पश्चिम, पूर्व, उत्तर, मध्य आणि नागपूर ग्रामीण अशा सर्व विधानसभा मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रात राबवला जाणार आहे.
इच्छुक व्यक्तींनी आपली माहिती संयोजक, ५, टिळकनगर, नागपूर-४४००१० किंवा संयोजक, मनपा ज्येष्ठ नागरिक कक्ष, मनपा मुख्य कार्यालय, सिव्हिल लाइन्स, नागपूर-४४०००१ या पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन सीनियर सिटीझन कौन्सिलतर्फे करण्यात आले आहे.








