मुंबईतील ३७ हजार फेरीवाले विनासंपर्क

महाराष्ट्र टाइम्स
मुंबईतील ३७ हजार फेरीवाले विनासंपर्क
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्रांचे वाटप मुंबई महापालिकेकडून सुरू आहे. पथविक्रेता सर्वेक्षणातून नोंदणीकृत झालेल्या ९९,४३५ पथविक्रेत्यांपैकी आत्तापर्यंत ५७,६९७ पथविक्रेत्यांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत. मात्र, ३७ हजार ७८८ पथविक्रेत्यांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही किंवा संपर्क होऊनही ते महापालिका कार्यालयात उपस्थित झालेले नाहीत, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरणासाठी ३१ ऑगस्ट, २०२६पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर येणाऱ्या कोणत्याही पथविक्रेत्यास ओळखपत्र वितरित केले जाणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
म पथविक्रेता धोरण आणि त्यासंबंधित कामकाजाचा आढावा महापौर रितू तावडे यांनी नुकताच महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात घेतला. सरकारकडून पथविक्रेता योजनेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर तत्काळ अंमलबजावणी करता यावी, यासाठी प्रशासकीय विभागांनी प्राथमिक तयारी पूर्ण ठेवावी आणि कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश महापौरांनी दिले.

नोंदणीकृत पथविक्रेत्यांपैकी पडताळणीदरम्यान ३,९५० अर्जदार मयत असल्याचे आढळले आहे. उर्वरितांमध्ये मोठी संख्या संपर्काबाहेर असल्याने ओळखपत्र वितरण प्रक्रियेला गती देण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. दरम्यान, पथविक्रेता समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. अशासकीय सदस्यत्वासाठी विविध संवर्गांतून एकूण १५३ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये अशासकीय संघटना आणि समुदाय आधारित संघटना संवर्गातून १०७, निवासी कल्याण संघ संवर्गातून २७, तर व्यापारी संघांच्या प्रतिनिधी संवर्गातून १९ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती पालिकेने दिली.