Fraud Of Two Crores Many Invested Money On The Temptation Of Partnership In Petrol Pump
पावणेतीन कोटींची १० जणांची फसवणूक
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
एका टोळक्याने १० जणांची पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. आखाती देशांमधून कच्चे तेल विकत घेऊन अन्य देशांना विकणाऱ्या कंपनीतील गुंतवणुकीवर दरमहा पाच ते दहा टक्के परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यातून हा प्रकार घडला.
या प्रकरणी गोहर उल इमान अंगोलकर, फराहदिबा अंगोलकर (दोघे रा. बेलगम, कर्नाटक), साजिद अनिफ नावडेकर (वय ४५), शाहीद अनिफ नावडेकर (वय ४९, दोघे रा. पनवेल, रायगड) या चौघांविरुद्ध फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कोंढवा येथील ३८ वर्षीय रहिवाशाने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २०२३ ते ऑगस्ट २०२६ दरम्यान घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गोहर हा आखाती देशातून कच्चे तेल विकत घेऊन ते भारत उपखंड, आफ्रिका, युरोप या देशात विक्री करतो. तेलाच्या भावात होणाऱ्या चढ-उतारामुळे त्याच्या कंपनीला मोठा फायदा होतो. त्याच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा पाच ते दहा टक्के परतावा मिळेल; तसेच वर्षभरानंतर गुंतविलेली मुद्दल परत मिळेल, असे प्रलोभन आरोपी साजिद आणि शाहीद यांनी तक्रारदारांसह अन्य गुंतवणूकदारांना दाखविले. त्यावर विश्वास ठेवून दहा गुंतवणूकदारांनी आरोपींकडे चार कोटी नऊ लाख ९४ हजार रुपये गुंतविले. त्यापैकी एक कोटी ३५ लाख रुपये त्यांना परत मिळाले. मात्र, उर्वरित दोन कोटी ७४ लाख ९४ हजार रुपये आरोपींनी परत केले नाहीत. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदारांनी कोंढवा पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस तपास करीत आहेत.
पुणे : पेट्रोल पंपाची उभारणी व संचालनात भागीदार करून घेण्याचे आश्वासन देऊन एकाने तरुणाची दोन कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी भूषण प्रभाकर वास्ते (वय ३५, रा. करकम, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत, कात्रज येथे राहणाऱ्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२१ ते गुन्हा दाखल होण्याच्या कालावधीत घडला. आरोपी वास्ते याने तक्रारदारांना पेट्रोल पंपाची उभारणी व संचालन व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखविले. त्यासाठी आरोपीने तक्रारदारांकडून वेळोवेळी स्वतःच्या आणि पेट्रोल पंपाच्या बँक खात्यावर कोट्यवधी रुपये वळते करून घेतले. त्यानंतर आरोपीने विश्वासघात करून फसवणूक केली, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.