Understand In The Voice Of Young Women Education Unemployment And Womens Safety
आम्हाला काय वाटते हे जाणून घ्या...
महाराष्ट्र टाइम्स•
शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी पालकांना करावे लागणारे कष्ट, पेपरफुटीच्या घटनांमुळे येणारे नैराश्य, नोकरीची टांगती तलवार, वाढती बेरोजगारी , महिलांची सार्वजनिक सुरक्षितता आणि निर्णयप्रक्रियेत महिलांना मिळणारे अपुरे स्थान... अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पंधरा हजारांहून अधिक तरुणी राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूँज’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. आम्हाला काय वाटते हे जाणून घ्या, आमचंही ऐकून घ्या.. असे स्पष्टपणे सांगतानाच, राहुल गांधी यांना तरुणांची भाषा कळते, त्यांचे भावविश्व ते समजतात, त्यामुळे त्यांच्याकडून आमच्या प्रश्नांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा तरुणींनी व्यक्त केली.
मी तरुणांची प्रतिनिधी म्हणून येथे आले आहे. तरुणांच्या प्रश्नांची कोणाला जाणीव आहे का, असाच प्रश्न आम्हाला पडतो. पेपरफुटीच्या घटना वारंवार घडत आहेत. या वेळी तरुणांनी आंदोलन केल्यानंतर सरकारला जाग आली. हे चित्र बदलले पाहिजे. आम्हाला आमची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे.- दीपिका सिंह
महिला समानतेबद्दल प्रत्येक निवडणुकीत राजकीय व्यक्ती बोलतात. मात्र, आजही आम्हाला आमच्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. सार्वजनिक सुरक्षितता अपुरी आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्येही मुलींना, महिलांना समान वागणूक मिळत नाही. शैक्षणिक पातळीवर गुणवत्ता सिद्ध करूनही रोजगाराच्या संधींसाठी आम्हाला झगडावे लागते आहे.
- कविता देशमाने
शिक्षणासाठी मोठा खर्च होत आहे. आमचे पालक दिवस-रात्र कष्ट करतात. तरीही शिक्षणानंतर नोकरी मिळेल, याची शाश्वती नाही. सरकार नोकरीच्या संधी वाढत असल्याच्या घोषणा करते; पण आमच्यासारखे अनेक जण आजही रोजगाराच्या शोधात आहेत. आमची बाजू ऐकून घेणारी व्यवस्था आम्हाला हवी आहे.
- बरखा कोचर
आम्हाला आजही मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले जात आहे. शहर असो वा गाव, महिलांसाठी सुरक्षित वातावरण अजूनही पुरेसे निर्माण झालेले नाही. सरकार केवळ घोषणा करते; पण महिलांच्या सन्मानासाठी प्रत्यक्षात पुरेसे होताना दिसत नाही. आम्हाला बदल हवा आहे. आम्हाला राहुल गांधी यांच्याकडून न्याय हवा आहे.
- रजिया शेख
तरुणांची शक्ती मोठी आहे; पण आम्हाला प्रशासकीय यंत्रणेतील काय कळते, असे राजकीय लोकांना वाटते. त्यामुळे आम्हाला कशातच गृहीत धरले जात नाही. त्यांना जे वाटेल ते आमच्यावर थोपवले जाते. आमची बाजू आणि आमचे प्रश्न समजून घेणारी व्यक्ती आम्हाला हवी आहे. राहुल गांधी यांनी आमची बाजू ऐकून घ्यावी, असे वाटते.
- अमिता चौधरी
आमच्या अस्तित्वाचा लढा कधी संपणार? शिक्षण घेतले, नोकरी केली तरी निर्णयप्रक्रियेत आजही पुरेसे स्थान मिळत नाही. आजही आमचा झगडा सुरू आहे. महिलांनी विविध क्षेत्रात प्रगती केली याचा गाजावाजा केला जात असला तरी, महिला सबलीकरणाचे गोडवे गायले गेले तरी, अनेक महिला आजही कुटुंबामध्ये पारतंत्र्यात जगत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला समानता हवी आहे.