Rahul Gandhis Students Voice Program In Pune Here To Hear The Thoughts Of Young Women
विचार जाणून घेण्यासाठी आलो
महाराष्ट्र टाइम्स•
‘आरटीओ पुणे’ स्टेशनवर मेट्रो थांबवून ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. शनिवारी पुणे मेट्रोच्या सेवेमध्ये कोणताही खंड पडलेला नाही किंवा सेवा बंद करण्यात आलेली नाही. संध्याकाळी ‘एआयएसएसएमएस’ कॉलेज येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी ‘आरटीओ पुणे’ या मेट्रो स्थानकात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन रामवाडी ते वनाझ या मार्गासाठी मेट्रोकडून दोन अतिरिक्त ट्रेनची सोय करण्यात आली होती. या दोन्ही ट्रेन ‘आरटीओ पुणे’ या स्थानकाच्या जवळ अतिरिक्त मेट्रो मार्गावर उभ्या करण्यात आल्या होत्या,’ असे ‘महामेट्रो’तर्फे स्पष्ट करण्यात आले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी-युवतींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. काहींनी तिरंग्याचे टॅटू रंगवले होते. काहींनी हाती तिरंगा घेतला होता. काहींच्या हातात राहुल गांधी यांचे पोस्टर्स आणि त्यांना पाठिंबा देणारा मजकूर असलेले फलकही होते. सुरुवातीला रॉक-हिपहॉप, रॅप आणि बॉलिवूडमधील विविध प्रसिद्ध गाण्यांचा बँडच्या तालावर कलाकारांनी सादरीकरण केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला.बरोबर साडेसात वाजता पिवळा फुल शर्ट घातलेल्या राहुल गांधी यांचे मंचावर आगमन होताच टाळ्यांच्या आणि ‘राहुल...राहुल’ अशा घोषणांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. ‘पुण्यातील या छान स्वागतासाठी धन्यवाद. आज मी तुम्हाला ‘लेक्चर’ देण्यासाठी किंवा राजकारणावर बोलण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला व्यक्त होण्याची संधी देण्यासाठी, तुमचे विचार जाणून घेण्यासाठी आलो आहे,’ अशा शब्दात गांधी यांनी युवतींना साद घालून सादरीकरणाच्या साह्याने आपले मुद्दे मांडले.
या प्रश्नांवर चर्चा...
काही विद्यार्थिनी आणि युवतींना मंचावर बोलावून घेऊन यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत राहुल गांधी म्हणाले, ‘हिंसाचार, अपमानास्पद वागणूक, नियंत्रित करण्याचा दबाव मुलींवर नेहमी टाकला जातो. दर वर्षी जन्माला येण्यापूर्वी साडेचार लाख मुलींना मारले जाते, ८० टक्के महिलांचा कधी ना कधी विनयभंग होतो, ३० टक्के महिलांवर कौटुंबिक हिंसाचार होतो, तर १०० पैकी सहा महिलांवर बलात्कार होतो. ५० टक्के महिला हिंसाचारातून वाचण्यासाठी शिक्षण बंद करून घरी बसतात. महिलांना केवळ सुरक्षिततेसाठी वार्षिक साडेसतरा हजार रुपये अधिक खर्च करावे लागतात.’
‘६० टक्के मुली एकट्या घराबाहेर पडत नाहीत. ४५ टक्के युवती लग्नासाठी किंवा घर सांभाळण्यासाठी शिक्षण वा नोकरी सोडतात. केवळ आठ टक्के महिलांकडेच स्वतःची स्वतंत्र मालमत्ता आहे. मुलींना कोणते काम करताना कोणाची तरी परवानगी घ्यावी लागते. मुली कुठे काम करताना त्यांना पुरुषांपेक्षा २५ टक्के पगार कमी मिळतो हे भेदभावाचे लक्षण आहे. १५ ते २९ वर्षातील मुलींना घरात रोज पाच ते सहा कामे करावी लागतात. त्याप्रमाणात मुले केवळ अर्धा तास काम करतात,’ याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
‘मलाही शिव्याच...’
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविला, तर शिव्या दिल्या जातात, असे सांगून एका तरुणीने पाच वर्षांपासून शिव्या दिल्या जात असल्याचे सांगितले. त्यावर क्षणाचा विलंब न करता मला पण वर्षानुवर्षे शिव्याच देत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
पुणे म्हणजे प्रेम
एक ते सव्वातास विविध क्षेत्रांतील तरुणी, विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधल्यानंतर कार्यक्रमाच्या अखेरीस पुण्याबद्दल काय वाटते, असा प्रश्न राहुल यांना विचारण्यात आला. त्या वेळी त्यांनी ‘पुणे म्हणजे प्रेम’ असे उत्तर मराठीतून दिले. त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.
सुविधांची वानवा
चार-पाच वाजल्यापासून विद्यार्थिनी कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या. त्यांच्यासाठी; तसेच देशभरातून आलेल्या पत्रकारांसाठी खुर्च्यांची व्यवस्था नव्हती. त्यांना तीन ते चार तास उभेच राहावे लागले. त्यामुळे काही विद्यार्थिनी चक्कर येऊन पडल्या. याउलट काँग्रेसची नेतेमंडळी खुर्चीत बसून होती. त्यांच्यासाठी खास खानपान व्यवस्थाही करण्यात आली होती.