अबोली रिक्षा पुरुषांच्या हाती

Contributed byरिक्षाचालक,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी|महाराष्ट्र टाइम्स
अबोली रिक्षा पुरुषांच्या हाती
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, त्यांना रोजगाराचे साधन मिळावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, या उद्देशाने सरकारने ‘ अबोली रिक्षा ’ योजना सुरू केली. मात्र, महिलांच्या नावावर रिक्षांचे परवाने घेतले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक रिक्षांचे हँडल पुरुषांच्या हाती असल्याची तक्रार पुढे येत आहे.

‘अबोली’ रिक्षा लाभार्थी महिलेनेच चालवून त्यातून अर्थार्जन करणे अपेक्षित आहे. सरकार निर्णयातही लाभार्थी महिलेनेच रिक्षा चालविणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा रिक्षा पुरुष चालविताना आढळल्यास संबंधितांवर कारवाईची जबाबदारी वाहतूक नियंत्रण पोलिस आणि परिवहन विभागावर सोपवली आहे. योजनेची अंमलबजावणी नियमांनुसार होत आहे का, याची तपासणी करण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये मागील वर्षी ‘अबोली’ रिक्षा योजनेंतर्गत १,२०० महिलांना लाभ देण्याचे नियोजन केले होते. यात लाभार्थी महिलेला रिक्षाच्या किमतीच्या २० टक्के अनुदान, १० टक्के स्वहिस्सा आणि ७० टक्के बँक कर्ज या पद्धतीने आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे.