Important Decision To Start Marathi Department In Private Universities In The State
खासगी, अभिमत विद्यापीठांतही मराठी विभाग
Contributed by: मराठी भाषामंत्री,विश्वस्त|महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आनंदाची बाब आहे. मात्र, मराठी ज्ञानभाषेसोबत रोजगाराची भाषा होण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. राज्यातील २६० बोलीभाषांपैकी १०० बोलीभाषांचा शब्दकोश तयार करून त्याचे प्रकाशन साहित्य संमेलनात करण्याची सूचना करण्यात आली आहे. विद्यापीठे व महाविद्यालयांनी या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, त्यांना मराठी भाषा विभागाकडून मदत केली जाईल,’ असे उदय सामंत यांनी सांगितले.
‘मराठी भाषेचा प्रसार-प्रचार करण्यासोबतच राज्यात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत मराठी पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक खासगी, अभिमत विद्यापीठ आणि खासगी महाविद्यालयात मराठी विभाग सुरू करण्यात येणार आहे. याबाबत सरकारकडून निर्णय प्रसिद्ध केला जाईल,’ अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३१ जानेवारीदरम्यान होणाऱ्या १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत, मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील सरकारी व खासगी विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिवांची बैठक झाली. या वेळी पाटील यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, कार्यवाह स्वाती महाळंक, समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे, सुनील महाजन, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.
परराज्यातून महाराष्ट्रात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा व तिचे ज्ञान मिळावे, यासाठी प्रत्येक विद्यापीठ व महाविद्यालयात मराठी विभाग कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश पाटील यांनी दिले. विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासह राज्यातील बोलीभाषा टिकविण्यासाठी दर वर्षी विद्यापीठस्तरावर राज्यस्तरीय विद्यार्थी संमेलन घेण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
सामंत यांनी राज्यातील विविध शहरांमधील ज्येष्ठ साहित्यिक, विद्यार्थी आणि नागरिकांना संमेलनस्थळी आणण्यासाठी प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री यांच्याशी संपर्क साधून परिवहन विभागाची मदत घेण्यात येईल, असे सांगितले. मराठी ही ज्ञानभाषा आणि रोजगाराची भाषा होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे डॉ. किरण कुलकर्णी यांनी नमूद केले. डॉ. देवळाणकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभाग संमेलनाच्या आयोजनात सहभागी असून, पारंपरिक अभ्यासक्रमांतील सुमारे १२ लाख विद्यार्थ्यांना संमेलनाशी जोडण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. डॉ. पवार यांनी आभार मानले.