81 Obstacle free Footpaths In Mumbai Ensuring Safety For Pedestrians
८१ पदपथ अडथळामुक्त
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मुंबईकरांना सुरक्षित आणि अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहर आणि उपनगरांतील पदपथांवरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अडथळे, साठवणूक साहित्य, फलक, बॅनर तसेच पादचारी मार्गात येणारे इतर अडथळे हटविण्याची कारवाई सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात २०० पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ८१ पदपथांवर काम हाती घेण्यात आले असून, सुमारे ६८ किलोमीटर लांबीचे पदपथ अडथळामुक्त करण्यात आले आहेत. या मोहिमेत एकूण ४४३ कारवाया सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात १ ते १४ ऑगस्ट, २०२६ या १४ दिवसांत एकूण ३३७ कारवाया करण्यात आल्या. यामध्ये ७७ अनधिकृत बांधकामे आणि ११२ अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्यात आले.
याशिवाय पदपथांवरील ४९ स्ट्रीट फर्निचर, ६३ ठिकाणचे साठवणूक साहित्य, २७ दुकानांचे फलक, १४ साइनबोर्ड आणि ४९ बॅनर हटविण्यात आले. पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या २५ अधिकृत दुकानांलगतच्या संरचनांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच, आठ पदपथांची दुरुस्ती करून पदपथांवर तयार झालेली आठ अनधिकृत वाहनतळे हटविण्यात आली.
पदपथ मोकळे केल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांकडून सातत्याने पाहणी करण्यात येत आहे. पदपथांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. पुन्हा अतिक्रमण झाल्याचे आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मुंबई रस्ता सुरक्षेच्या २०२३च्या वार्षिक अहवालानुसार, रस्ते अपघातातील एकूण मृत्यूंपैकी ४४ टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे होते. या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि सुटसुटीत पदपथ उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.