‘सीएम फेलोशिपमधून प्रशासनाला नवा दृष्टिकोन’

महाराष्ट्र टाइम्स
‘सीएम फेलोशिपमधून प्रशासनाला नवा दृष्टिकोन’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘ मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे प्रशासनाला नव्या पिढीचा दृष्टिकोन, नावीन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाची जोड मिळेल. फेलोंनी फेलोशिपच्या अनुभवातून आपल्या कार्यक्षेत्रात परिवर्तन घडविण्याचे काम करावे’, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या निर्मितीत युवा पिढीची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या ॲप्रिसिएशन आणि नवीन तुकडीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘सरकारमध्ये अनुभवी आणि गुणवत्तापूर्ण अधिकारी असले तरी दीर्घकाळ एकाच पद्धतीने काम करताना कल्पकता आणि प्रत्यक्ष संपर्क काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनात नवे विचार आणणे आणि त्याचवेळी तरुणांना शासनाची कार्यपद्धती समजून देणे, हा फेलोशिप कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. ‘फेलोशिप’ हा एकतर्फी अनुभव नसून फेलोंकडून प्रशासनालाही नवे विचार आणि दृष्टिकोन मिळतात. नवीन पिढीच्या आकांक्षा आणि कार्यपद्धती समजून घेतल्याशिवाय सर्वसमावेशक प्रशासन शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने बदल स्वीकारत अधिक गतिमान होणे आवश्यक आहे’, असे ते म्हणाले.
‘प्रशासनामध्ये बदलासाठी केवळ शासन निर्णयाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. लोकाभिमुख आणि सोपी कार्यपद्धती आधी स्वीकारून त्यानुसार शासन निर्णय करण्याची नवी कार्यसंस्कृती विकसित झाली पाहिजे’, असे त्यांनी सांगितले. ‘सरकारच्या १०० दिवसांच्या आणि १५० दिवसांच्या कार्यक्रमांतही फेलोंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आवास योजना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, लखपती दीदी, शेतकरी व महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच आदिवासी भागातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कामातही फेलोंनी प्रभावी भूमिका बजावली’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.