विद्यार्थ्यांना विषय निवडीची संधी

Contributed byरोहन टिल्लू rohan.tillu@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
विद्यार्थ्यांना विषय निवडीची संधी
मुंबई : जेईईच्या गुणांनुसार शाखा निवडायची, चार वर्षे ठरावीक अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि त्यानंतर नोकरीच्या दिशेने वाटचाल करायची, ही अभियांत्रिकी शिक्षणाची नेहमीची चौकट. मात्र, विद्यार्थ्याला नेमके काय शिकायचे आहे, त्याचा भविष्यातील कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, यानुसार शिक्षणाची दिशा ठरवता आली तर? आयआयटी मुंबईच्या बहुविद्याशाखीय शिक्षण केंद्रामुळे (सीएमई) विद्यार्थ्यांना अशीच संधी मिळत आहे. पहिल्या वर्षानंतर या केंद्रात प्रवेश घेऊन आयआयटी मुंबईतील विविध विभागांमधील अभ्यासक्रमांची निवड करत विद्यार्थी स्वतःचा अभ्यासक्रम आखू शकतात.

गणित विषयातील पदवीसाठी आयआयटी मुंबईत दाखल झालेला ऋषिकेश शिंदे याचे उदाहरण यासाठी महत्त्वाचे आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतलेल्या ऋषिकेशला संगीत आणि संगीत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. मात्र, पारंपरिक अभ्यासक्रमात त्याला या आवडीसाठी पुरेशी मोकळीक मिळत नव्हती. २०२३मध्ये सीएमईची माहिती मिळाल्यानंतर त्याने या केंद्राची वाट निवडली. कृत्रिम प्रज्ञा, यंत्र-अध्ययन, अभिकल्प, विद्युत अभियांत्रिकी, मानवविद्या आणि ग्रामीण अभ्यास अशा विविध विषयांची त्याने निवड केली. राग ओळखणे आणि संगीतनिर्मिती यांसारख्या संगीत तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्पांवरही त्याने काम केले. पुढे एक्स्पेडिया समूहात यंत्र-अध्ययन अभियंता म्हणून प्रशिक्षणाची संधी मिळाली आणि त्याला नोकरीची ॲाफरही मिळाली.
‘जेईईतील गुणक्रमांकानुसार विद्यार्थी शाखा निवडतात; मात्र, आयआयटीत आल्यानंतर अनेकांना आपण निवडलेल्या क्षेत्रात पुढे जायचेच नाही, याची जाणीव होते. विद्यार्थी जेईईच्या गुणक्रमांकावरून शाखा निवडतात. इथे आल्यानंतर अनेकांना वाटते की, मला आयुष्यभर हेच करायचे नाही’, असे सीएमईचे प्रमुख प्रा. राजेश झेले सांगतात. आयआयटी मुंबईतील विद्युत अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी असलेल्या झेले यांनी सेमीकंडक्टर उद्योगात दोन दशकांहून अधिक काळ काम केल्यानंतर आयआयटी मुंबईत विद्युत अभियांत्रिकीचे प्राध्यापक म्हणून प्रवेश केला. विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक वाटचालीचा पुनर्विचार करता यावा, या उद्देशाने सीएमईची संकल्पना पुढे आली.

सीएमईमध्ये पारंपरिक विभागाप्रमाणे ठरावीक विषयांची यादी नाही. विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईतील विविध विभागांमधून अभ्यासक्रम निवडता येतात. मात्र, हे स्वातंत्र्य पूर्णपणे अमर्याद नाही. दुसऱ्या वर्षात मानवविद्या व सामाजिक शास्त्रे, अभिकल्प, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, पर्यावरण व ग्रामीण अभ्यास आणि अभियांत्रिकी या सहा व्यापक क्षेत्रांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जातो. त्यानंतर आपल्या आवडीनुसार विविध विषयांची सांगड घालता येते.

विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार अभ्यासक्रम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे; मात्र ते पूर्णपणे मोकाट नाहीत. काही शैक्षणिक चौकटी आहेत, असे झेले यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विद्यार्थ्याला प्राध्यापक सल्लागार दिला जातो. अभ्यासक्रम ठरवण्याचा निर्णय मात्र विद्यार्थ्याचाच असतो. विविध विभागांतील प्राध्यापकांसोबत काम करण्याची, प्रकल्प आणि चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्याची संधीही त्यांना मिळते.

या उपक्रमाचा उद्देश केवळ कृत्रिम प्रज्ञा किंवा त्या काळातील लोकप्रिय विषयांचा अभ्यास करणे हा नसल्याचे झेले यांनी सांगितले. ‘हाच लोकप्रिय विषय आहे म्हणून विद्यार्थ्यांनी त्यातील सर्व अभ्यासक्रम घ्यावेत, असे आम्हाला अपेक्षित नाही. खऱ्या अर्थाने बहुविद्याशाखीय विषयांची सांगड घालावी, ही आमची भूमिका आहे’, असे ते म्हणाले. शाश्वत विकासाच्या क्षेत्रात उद्योग सुरू करू इच्छिणारा विद्यार्थी व्यवस्थापन, अर्थशास्त्र, अभिकल्प आणि पर्यावरणाचा एकत्रित अभ्यास करू शकतो. तर अभियांत्रिकीसोबत मानवविद्या, संगीत किंवा अन्य कलाविषयांची सांगडही घालता येत”, असे त्यांनी म्हटले.