लज्जा असेल तर हात जोडून माफी मागा!

Contributed byजयपूर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
लज्जा असेल तर हात जोडून माफी मागा!
‘काँग्रेसने ‘ वंदे मातरम् ’चा अवमान केला असून, तुमच्यात जराशी लज्जा शिल्लक असेल तर या चुकीसाठी नागरिकांची तसेच हे गीत लिहिणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अमर आत्म्याची हात जोडून माफी मागा’, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांनी सोनिया गांधी यांना उद्देशून केली. चित्तोडगड येथे झालेल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते.

‘काँग्रेसच्या मुख्यालयातील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सोनिया गांधी यांनी हे गीत मध्येच थांबवण्याची सूचना केली’, असा आरोप भाजपने शनिवारी केला होता. शहा यांनी या सभेत त्याचा पुनरुच्चार केला. ‘वंदे मातरम्’ गायल्याबद्दल हजारो देशभक्तांनी स्वातंत्र्यलढ्यात गोळ्या आणि लाठ्या झेलल्या, तुरुंगवास भोगला. मात्र काँग्रेसच्या मुख्यालयात या राष्ट्रीय गीताच्या सादरीकरणाच्या वेळी सोनिया गांधी यांनी ते मध्येच थांबवण्याची वारंवार सूचना केली. त्यांच्यात जराशी लज्जा शिल्लक असेल तर त्यांनी यासाठी नागरिकांची आणि बंकिमबाबूंची हात जोडून माफी मागावी’, असे शहा म्हणाले.
कोलकाता : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे थेट वंशज आणि भाजपचे आमदार सुमित्रो चॅटर्जी यांनीही या प्रकरणी सोनिया गांधी यांच्याकडून एका पत्राद्वारे बिनशर्त माफीची मागणी केली आहे. ‘स्वतंत्र भारताच्या भूमीवर ‘वंदे मातरम्’ पूर्ण स्वरूपात सादर करण्याबाबतची अनिच्छा ही खुदीराम बोस यांसारख्या हुतात्म्यांच्या बलिदानाचा अवमान आहे. काँग्रेसचा हा दुटप्पीपणा नवीन नाही’, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.