‘नीट’, ‘सीईटी’, ‘टीईटी’ या परीक्षांतील गोंधळानंतर आता न्यायालयीन लिपिक पदासाठी रविवारी (दि. १६) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या ‘टायपिंग स्किल’ परीक्षेतही गोंधळ झाल्यामुळे शेकडो परीक्षार्थींना फटका बसला. संगणक, की-बोर्डसह सर्व्हरच्या अडचणींमुळे अनेकांना परीक्षा देता आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या परीक्षार्थिंनी केंद्रांबाहेर ठिय्या मारला. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनीही छत्रपती संभाजीनगर येथील सेव्हन हिल परिसरातील केंद्राबाहेर आंदोलनात सहभाग घेत जाब विचारला. मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
न्यायालयीन लिपिक पदांसाठी रविवारी विविध केंद्रांवरून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. राज्यभरातील अनेक परीक्षा केंद्रांवर या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाला. परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाउन झाल्याचा दावा परीक्षार्थी उमेदवारांकडून करण्यात आला. तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा खोळंबल्याचा आरोप करीत उमेदवारांनी परीक्षा केंद्राबाहेर संताप व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरमधील सेव्हन हिल परिसरातील केंद्राबाहेर विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली, ठिय्या मांडत परीक्षेबाबत तक्रारी मांडल्या. संगणक, की-बोर्ड योग्य पद्धतीने काम करीत नव्हते, सर्व्हरच्या अडचणींमुळे परीक्षा देता आली नाही, परीक्षेचे नियोजनही व्यवस्थित नव्हते, अशा तक्रारी उमेदवारांनी मांडल्या. यानंतर दीपके यांनी परीक्षार्थी उमेदवारांच्या समर्थनार्थ परीक्षा केंद्रावर हजेरी लावत आंदोलनात सहभाग नोंदविला. उमेदवारांनी त्यांच्यासमोर अडचणी मांडल्या. प्रशासनाने उमेदवारांचे म्हणणे ऐकून घ्यावे, फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणीही दीपके यांनी केली.कल्याण : न्यायालयीन लिपिक पदाच्या परीक्षेसाठी कल्याण केंद्रावर आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरील अनियमितता आणि गोंधळाचा फटका बसला. सकाळी ६ वाजता केंद्रावर उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्याना संध्याकाळी उशिरापर्यत थांबून देखील परीक्षा देता आली नसल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत प्रशासनाला जाब विचारला. केंद्रावरील गोंधळाची माहिती घेण्यासाठी आलेल्या न्यायाधीशांकडून देखील विद्यार्थ्याच्या समस्येवर तोडगा काढता आला नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, न झालेली परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयाकडे सादर केला जाणार असून, त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पाहणी करण्यासाठी आलेल्या न्यायालयीन अधिकाऱ्यांनी सांगितले.