चाकण उद्योगप्रश्नी उच्चस्तरीय समिती

Contributed byमुंबई|महाराष्ट्र टाइम्स
high level committee established for chakan industries to address traffic congestion and road repairs
चाकण औद्योगिक परिसरातील रस्ते दुरुस्ती , वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. याशिवाय उद्योगांच्या विविध शासकीय विभागांकडे प्रलंबित असलेल्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘उद्योग तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे.

चाकण परिसरातील रस्त्यांची झालेली चाळण, सततची वाहतूक कोंडी, ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि कचऱ्याचे ढीग याला कंटाळून चाकणमधील २० कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत राज्य सरकारने चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समिती नेमली आहे. नियोजन विभागाने शुक्रवारी समिती गठित करण्याबाबतचा शासन निर्णय काढला आहे. या समितीत पोलिसांसह पुणे महापालिका, पुणे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, एमएसआरडीसी, पीएमआरडीए, उद्योग संघटनाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव असतील.