खाद्यपदार्थांमधील भेसळ, निकृष्ट दर्जा समोर येत असताना रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या शुद्धतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक रेल्वे स्थानकांवरील ‘वॉटर कूलर’मधून घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ‘ई-कोलाय’ जीवाणू आढळले. यामध्ये मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या स्थानकांचा समावेश आहे. ‘कॅग’च्या अहवालातून यासह अनेक गंभीर बाबी समोर आल्या.
दक्षिण रेल्वेच्या कोइम्बतूर आणि पलक्कड जंक्शन, दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद, पूर्व रेल्वेच्या माधवपूर या रेल्वे स्थानकांवरील कूलरमधील पाण्याच्या नमुन्यांत ई-कोलाय आढळला. सर्व क्षेत्रांमधील ५१२ बिगर उपनगरीय श्रेणीतील स्थानकांवरील प्रवासी सुविधांचा आढावा या अहवालात घेण्यात आला. या अहवालात २०१९-२० ते २०२३-२०२४ या कालावधीतील नमुना तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या प्रकरणांचा, तसेच यापूर्वी नोंद न झालेल्या जुन्या प्रकरणांचा आणि आवश्यक तिथे २०२३-२०२४नंतरच्या प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे. अहवालानुसार, बिगर उपनगरीय गटात ५,९०८ रेल्वे स्थानकांचा समावेश होतो.
४५८ स्थानकांवर सुविधांत त्रुटी
रेल्वे बोर्डाने स्थानकांवर प्रवासी सुविधा पुरवण्याबाबत विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. प्रवासी सुविधा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांतून अपेक्षित लाभ मिळाले आहेत की नाही, याचे मूल्यांकन करण्यासाठी हे लेखापरीक्षण करण्यात आले, असे कॅगकडून सांगण्यात आले. निवडलेल्या ५१२ स्थानकांपैकी ४५८ स्थानकांवर किमान आवश्यक सुविधा पुरवण्यात त्रुटी होत्या. अशा स्थानकांचे प्रमाण ८९ टक्क्यांहून अधिक आहे. ‘एप्रिल २०१८ मध्ये, रेल्वे बोर्डाने एनएसजी-१ ते एनएसजी-६ या श्रेणींमधील स्थानकांसाठी ‘किमान आवश्यक सुविधा’, ‘शिफारस केलेल्या सुविधा’ आणि ‘अपेक्षित सुविधा’ निश्चित करणाऱ्या सर्वसमावेशक सूचना जारी केल्या होत्या.