Record Voter Turnout In Bihar Assembly Elections Attributed To Sir
‘‘एसआयआर’मुळेच विक्रमी मतदान’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘गेल्या वर्षी बिहारमध्ये मतदारयाद्यांची विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) यशस्वीरित्या राबवण्यात आल्यामुळेच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली,’ असा दावा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी रविवारी केला.
राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या कुमार यांनी पाटणा विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. सन २०२५च्या बिहार विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या प्रगत देशांतील निवडणुकांपेक्षाही अधिक होती, असे त्यांनी सांगितले.‘बिहार ही लोकशाहीचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या वैशालीची भूमी आहे. येथे पहिल्यांदाच ‘एसआयआर’ यशस्वीरित्या राबवण्यात आली, याचा आम्हाला अभिमान आहे,’ असे कुमार म्हणाले. ‘तीन महिन्यांच्या कालावधीत राबवण्यात आलेल्या या व्यापक प्रक्रियेत सुमारे ७० लाख नावे मतदारयाद्यांतून वगळण्यात आली. त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली,’ असेही त्यांनी नमूद केले.
‘स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले आणि राज्यातील सर्व विक्रम मोडीत निघाले. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, स्पेन आणि जपानसारख्या मोठ्या लोकशाही देशांमध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या मतदानापेक्षाही बिहार विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी अधिक होती,’ असे कुमार यांनी सांगितले.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत ६७.२५ टक्के मतदान झाले होते. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, स्वातंत्र्यानंतर राज्यातील हे सर्वाधिक मतदान होते.
कुमार सोमवारी राजगीर येथील नालंदा विद्यापीठात सुमारे ५०० बूथस्तरीय अधिकाऱ्यांशी (बीएलओ) संवाद साधणार आहेत. या वेळी ते त्यांच्या कामातील अडचणी जाणून घेतील आणि निवडणूक प्रक्रिया अधिक प्रभावी व सुलभ करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करतील.