Shah Rukh Khan Ajay Devgn And Tiger Shroff Issued Notice For Pan Masala Advertisement
शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस
Contributed by: मुंबई|महाराष्ट्र टाइम्स•
सुपरस्टार शाहरुख खान याच्यासह अभिनेता अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’ची जाहिरात करणे अंगलट आले आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नुकतीच या तिन्ही अभिनेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. ‘संबंधित जाहिरात प्रतिबंधित पान मसाला, तंबाखूजन्य उत्पादनाच्या अप्रत्यक्ष किंवा सरोगेट जाहिरातीसाठी वापरली जात आहे का’, याची चौकशी आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील हॉटेल, रेस्तराँ, उपाहारगृहांसह अन्य आस्थापनांना अन्नपदार्थांच्या सुरक्षितेसाठी सुरू केलेल्या कठोर कारवाईनंतर आता अशा जाहिरातींमधील सेलिब्रेटींच्या सहभागाकडे मोर्चा वळवला आहे. कलाकारांना पाठविलेल्या या ‘कारणे दाखवा’ नोटिशीनंतर पान मसाला वा तत्सम उत्पादनांच्या जाहिरातीत सेलिब्रेटींच्या सहभागावर निर्बंध येतील, असा कयास मांडला जात आहे.या नोटिशीमध्ये १५ दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण देणे व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात संबंधित अभिनेत्यांना व्यक्तिशः सुनावणी हवी असल्यास तशी लेखी मागणीही करता येईल. मुदतीत उत्तर न दिल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे.