Tension In India bangladesh Dialogue Sheikh Hasinas Extradition Issue
संवादावर परिणाम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘ब्रिक्स’चे निमंत्रण पंतप्रधानांना वैयक्तिकरीत्या नव्हते, तर ‘बिमस्टेक’च्या अध्यक्षांना उद्देशून होते,’ असे वक्तव्य त्या बैठकीनंतर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री खलीलुर रहमान यांनी केले होते. बिमस्टेक हा बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या सात देशांचा आंतरराष्ट्रीय समूह आहे. या प्रादेशिक समूहाचे अधिकृत अध्यक्षपद सध्या बांगलादेशकडे आहे. मात्र, भारताने बांगलादेशच्या पंतप्रधानांना द्विपक्षीय दौऱ्याचे निमंत्रण दिले आहे; तसेच ब्रिक्स शिखर परिषदेच्या बैठकीसाठी भारत भेटीचे निमंत्रणही बांगलादेशच्या पंतप्रधानांना देण्यात आले आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान तारिक रहमान यांच्या भारत दौऱ्यासाठी भारताने ‘अनुकूल वातावरण’ निर्माण करणे गरजेचे आहे,’ असे सांगून बांगलादेशने रविवारी या भेटीचा संबंध पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेशी आणि प्रत्यार्पणाशी जोडला. शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेमुळे दोन्ही देशांतील संवाद प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शाहिदुल करीम यांनी म्हटले.पंतप्रधान रहमान यांना १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारताने आमंत्रण दिले आहे. दोन्ही देशांतील ताणलेले संबंध लक्षात घेऊन त्यांच्या भेटीबाबत अनिश्चितता असतानाच ही नवी घडामोड समोर आली आहे. रहमान यांनी १० ऑगस्ट रोजी भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी पुन्हा मांडली. याआधीही बांगलादेशाकडून भारताला औपचारिक विनंत्या पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, रहमान भारतात जाणार की नाही, याबाबत स्पष्टता नव्हती.
‘पंतप्रधान तारिक रहमान यांच्या भारतातील दौऱ्याच्या शक्यतेबाबत बांगलादेश आणि भारताचे अधिकारी गेल्या काही आठवड्यांपासून संपर्कात आहेत,’ असे प्रवक्ते करीम यांनी सांगितले. या संदर्भात सरकारी वृत्तसंस्था बांगलादेश संगबाद संस्थेने (बीएसएस) रविवारी वृत्त दिले. मात्र, पाच ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी नवी दिल्लीतून आभासी पद्धतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे करीम यांनी माध्यमांना सांगितले. ‘या मुद्द्यावर आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. त्यानुसार, शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवर भारतीय अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी आम्ही विनंती केली आहे,’ असे ते म्हणाले.
उस्मान हादी यांच्या हत्येशी संबंधित आरोपींच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी केली. या हत्येप्रकरणातील तीन संशयित सध्या कोठडीत आहेत.