Vajpayees Incomparable Role The Background Of Experience Given To National Progress
‘वाजपेयी यांची भूमिका अतुलनीय’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. देशाच्या प्रगतीत वाजपेयी यांची भूमिका अतुलनीय असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले.
पंतप्रदान मोदी आणि भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह नेत्यांनी वाजपेयी यांच्या ‘सदैव अटल’ या स्मारकाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली. मोदी यांनी वाजपेयी यांचे वर्णन ‘उल्लेखनीय दूरदृष्टी असलेले असामान्य मुत्सद्दी’ असे केले. ‘वाजपेयी यांचे शब्द, प्रयत्नांनी पिढ्यांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या नेतृत्वाने देश लक्षणीयरित्या बळकट झाला’, असेही ते म्हणाले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजस्थानच्या चित्तोडगढ जिल्ह्यात वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही वाजपेयी यांच्या स्मारकाला भेट देऊन, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकासात नवीन उंची गाठल्याचे नमूद केले. वाजपेयी हे लाखो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्रोत असल्याचे केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी म्हणाले; तर, ‘वाजपेयी यांनी घातलेला भक्कम पाया मार्गदर्शन करत राहील’, असे केंद्रीयमंत्री पीयूष गोयल म्हणाले.