भारताच्या पुरुष हॉकी संघापाठोपाठ महिला संघाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या अव्वल साखळीत प्रवेश केला. भारतीय महिलांना गुरुवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या साखळी लढतीत हार टाळणे आवश्यक होते. भारतीय संघांनी भक्कम बचावात्मक खेळ करून ही मोहीम साध्य केली. ही लढत गोलशून्य बरोबरीत सुटली.
भारतीय महिला संघाने सकारात्मक खेळ केला. आगेकूच करण्यासाठी विजय आवश्यक असलेला इंग्लंडचा संघ जास्त आक्रमक होता. त्यामुळे त्यांनी वर्चस्व राखले. मात्र, त्याच वेळी भारतीय संघाला दवडलेले सहा पेनल्टी कॉर्नर; तसेच मैदानी गोलच्या संधी सलत असतील. वेगवान आणि आश्वासक सुरुवात केलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या सत्रापासून वर्चस्व गमावले. त्यांना इंग्लंडची आक्रमणे रोखण्यासाठीच जास्त प्रयत्न करावे लागले. त्यातच चेंडूवर ताबा असतानाही चुका झाल्या. कर्णधार सलिमा टेटे गोलक्षेत्रात आली. तिने साक्षी राणा, सविता पुनियाच्या साथीत इंग्लंडचे १२ पेनल्टी कॉर्नर विफल ठरवले.भारतीय खेळात नक्कीच उणिवा होत्या. मात्र, त्यांची लढाऊ वृत्ती कौतुकास्पद होती. अखेरच्या दहा मिनिटांत इंग्लंडने अथक आक्रमणे केली. त्यांनी गोलरक्षिकेसही काढले. मात्र, भारतीयांनी चिवट खेळ केला. अक्षरशः गोलरेषेवरून भारतीयांनी प्रतिकार केला. भारतीय महिलांची आता आज, अव्वल साखळीत नेदरलँड्सविरुद्ध लढत होईल.