Intense Conflict Over Marathi Language Issue In Assembly
मराठीच्या आग्रहावरून महासभेत राडा
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
सभागृह तहकूब झाल्यानंतरही संबंधित नगरसेवकांमधील वाद सुरूच होता. सभागृहाबाहेरही काही काळ वातावरण तापले होते. अखेर ज्येष्ठ नगरसेवकांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूंच्या सदस्यांना शांत केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर महापौरांनी भाषेबाबत भूमिका स्पष्ट केली. सभागृहात मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेतूनही सदस्यांना आपले म्हणणे मांडता येईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर महासभेचे कामकाज सुरळीत सुरू झाले.
महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या महासभेत मराठी भाषेतून बोलण्याच्या आग्रहावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. महापौर नीता ठाकरे यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. सुरुवातीला शिक्षण सभापती संतोषदेवी लढ्ढा यांनी महाराष्ट्राच्या परंपरेतील वारीचे महत्त्व हिंदीतून सांगितले. त्यावर काँग्रेसचे नगरसेवक केतन ठाकरे यांनी आक्षेप घेतला. महाराष्ट्रात ऑटोचालकांना परवाना देताना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सभागृहातील कामकाजातही मराठी भाषेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली.
यानंतर काही काळ कामकाज सुरळीत सुरू होते. दरम्यान, काँग्रेसचे नगरसेवक वसीम खान प्रश्न मांडण्यासाठी उभे राहिले. त्यांनी आपण लवकरच मराठी शिकणार असून, सध्या प्रश्न हिंदीतून मांडण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती महापौरांकडे केली. त्यावर सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनी, ‘कोणत्या भाषेत बोलायचे, याची परवानगी केतन ठाकरेंकडून घ्यावी’, असा टोला लगावला.
या वक्तव्यावर काँग्रेसचे नगरसेवक संतप्त झाले. भाषेची परवानगी महापौरांकडे मागितली आहे, सत्ताधारी नगरसेवकांकडे नाही, असे सांगत त्यांनी आक्षेप घेतला. यानंतर दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. काँग्रेसचे नगरसेवक अभिजीत झा आणि भाजपचे नगरसेवक हेमंत बरडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांनी आपल्या पक्षातील नगरसेवकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.