गतविजेत्या झारखंडला मुलींच्या ज्युनियर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील उपांत्यपूर्व लढतीत कडव्या संघर्षाला सामोरे जावे लागले. अखेरीस झारखंडने पेनल्टी शूटआउटमध्ये ओडिशावर मात केली आणि उपांत्य फेरी गाठली. दरम्यान, हरयाणा, छत्तीसगड संघांनीही आगेकूच केली.
नेहरुनगर (पिंपरी) येथील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. झारखंडविरुद्धच्या लढतीत ओडिशाने चांगली सुरुवात केली होती. २४व्या मिनिटाला अंजूलता लुगानने गोल नोंदवून ओडिशाचे खाते उघडले. त्यानंतर झारखंडने बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले. ३३व्या मिनिटाला रजनी केरकेटाने गोल नोंदवून झारखंडला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघांनी आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केला. मात्र, त्यांना यश लाभले नाही. अर्थात, बरोबरी निर्धारित वेळेअखेरपर्यंत कायम राहिली. त्यानंतर ‘शूटआउट’मध्ये झारखंडकडूून सलोमी नाग, अनुप्रिया सोरेंग, स्विटी डुंगडुंग, रजनी केरकेटा यांनी गोल नोंदवले, तर ओडिशाकडून द्रुपती नाईक, आशिका आमाद आणि अजिता इक्का या तिघींनाच गोल नोंदवता आले. दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत काजलचे दोन (२५. ४३ मि.) आणि तन्वीच्या एका (३७ मि.) गोलच्या जोरावर मध्य प्रदेश संघाने मणिपूरवर ३-१ अशी मात केली.