नवी दिल्ली : ‘कोण जाणे दुखापत होती की, डावपेच? वेळ काढण्यासाठी वांगने तसे केलेही असेल’ अशी टिप्पणी भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्हि. सिंधू हिने गुरुवारी पराभवानंतर केली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत सिंधूला जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील वांग झी यि (चीन) हिच्याकडून ११-२१, २१-१५, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी आयुष शेट्टीही पराभूत झाल्यामुळे भारताच्या या स्पर्धेतील आशा आता दुहेरीतील कामगिरीवरच अवलंबून असेल.
'तिची दुखापत किंवा डावपेच... जे काही असतील; पण मी संयम राखायला हवा होता हेदेखील तितकेच खरे. खासकरून सामन्यातील अखेरच्या तीन गुणांच्यावेळी. एकूणच आता विश्लेषण करायचे झाले तर या सामन्यातील माझ्याकडून चुका जवळपास झालेल्याच नाहीत. लढत खूपच छान झाली. यापुढे संयम वाढवण्यावर अधिक मेहनत घेईन', असे सांगत सिंधूने आपली चूकही मान्य केली. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सिंधूच्या पालकांचा उत्साह अन् चाहत्यांनी तिचा उत्साह वाढवण्याची एकही संधी सोडली नाही. आपल्या या लाडक्या खेळाडूचा पराभव त्यांच्याही जिव्हारी लागला असावा; म्हणूनच की काय सिंधूने अखेरचा गुण गमावला अन् प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने काढता पाय घेतला.