वाढदिवसाच्या पार्टीसाठी जाताना भरधाव कार उभ्या ट्रकवर आदळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारचालक अल्पवयीन मुलाच्या पालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. ए. ए. जोगळेकर यांनी गुरुवारी हा आदेश दिला. याप्रकरणी पालकांनी सीसीटीव्ही पुरावे नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
पावनगाव-भरतवाडा वाय पॉइंट मार्गावर १२ ऑगस्ट रोजी पहाटे हा अपघात झाला होता. यात भौमिक अमोल लारोकर (वय १६) आणि सागर संजय मेलवानी (वय १७) यांचा मृत्यू झाला, तर अन्य एक अल्पवयीन गंभीर जखमी झाला. तिघेही अकरावीत शिकत होते. अल्पवयीन मुलगा वडिलांची कार घेऊन मित्रांसह फिरण्यासाठी निघाला असताना नियंत्रण सुटून कार ट्रकवर आदळली.या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या पालकांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, वाहन त्यांच्या नावावर असून मुलगा मागील वर्षभरापासून ते चालवत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. घरातील सीसीटीव्हीचे चित्रण तसेच सामाजिक माध्यमांवरील संबंधित मजकूर हटविण्यात आल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता असल्याने कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे अर्ज फेटाळण्यात आला.