Terrorist Attack In Mumbai Action Against Accused Initiated
मुंबईवरील हल्ल्याच्या सूत्रधारांची घेराबंदी
Contributed by: जळगाव|महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मुंबईवरील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार हाफिज सईद , झकी-उर-रहमान लखवी आणि साजिद मीर यांच्यासह सहा फरार पाकिस्तानी दहशतवाद्यांची भारताने घेराबंदी करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील नवीन तरतुदींनुसार या सर्व आरोपींवर त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील तथा राज्यसभेचे खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी दिली.
गुरुवारी जळगाव येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. ॲड. निकम यांनी सांगितले की, न्यायालयाने या सर्व फरार आरोपींना न्यायालयात हजर राहण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनामा लागू झाल्यापासून पुढील ९० दिवसांत या दहशतवाद्यांविरोधातील सर्व पुरावे न्यायालयात सादर केले जातील. आरोपी प्रत्यक्ष उपस्थित नसले, तरी कायदेशीर नियमानुसार त्यांना बचावाची पूर्ण संधी दिली जाईल. मात्र, पुढील तीन वर्षांच्या कालावधीतही हे आरोपी न्यायालयासमोर उपस्थित झाले नाहीत, तर न्यायालय अंतिम निकाल घोषित करू शकते, असे कायदेशीर विश्लेषण त्यांनी मांडले.पाकिस्तान या सर्व दहशतवाद्यांना जाणीवपूर्वक आश्रय देत असून त्यांचा बचाव करत आहे, असा थेट आरोपही ॲड. निकम यांनी केला.
इंटरपोलच्या मदतीने पाकिस्तानची कोंडी
न्यायालयाचा जाहीरनामा ‘इंटरपोल’च्या माध्यमातून थेट पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध करण्याबाबत केंद्र सरकारला सुचवण्यात आले असून, लवकरच याबाबत अहवाल प्राप्त होईल. या खटल्याचा निकाल हाती आल्यानंतर दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानवर जागतिक पातळीवर कडक कायदेशीर आणि राजकीय दबाव आणणे भारतासाठी अधिक सोपे होईल, असा विश्वास ॲड. निकम यांनी व्यक्त केला.
२६/११ हल्ल्याचा मुख्य उद्देश भारताविरोधात अघोषित युद्ध छेडणे हा होता. अजमल कसाबच्या खटल्यादरम्यान हा आरोप सिद्ध झाला असून, सर्वोच्च न्यायालयानेही तो मान्य केला आहे. आता हाफिज सईद, झकी-उर-रहमान लखवी, मेजर अब्दुल पाशा, अबू काफा आणि साजिद मीर यांच्यासह सहाही पाकिस्तानी आरोपींविरोधात डेव्हिड हेडलीची साक्ष आणि इतर भक्कम पुरावे न्यायालयात मांडण्यात आले आहेत.