इस्तंबूल, दि. २० - तुर्कस्तानात काल झालेल्या अतिभीषण भूकंपात किमान १,४३२ माणसे ठार झाली आहेत. पूर्वेकडील प्रांतांतील शहरे या भूकंपाने उद्ध्वस्त झाली आहेत. तुर्कस्तानच्या इतिहासात गेल्या २३ वर्षांत असा भूकंप झालेला नाही.मृत्युसंख्या हजारोंवर जाईल, असा अधिकाऱ्यांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास अंदाज व्यक्त केला आहे. एकट्या वार्तो शहरात १,०६९ माणसे प्राणास मुकली आहेत. गृहखात्याच्या निवेदनानुसार ५४५ माणसे मृत पावली. पण मूस प्रदेशाचे राज्यपाल म्हणाले की, केवळ माझ्या प्रदेशात २,५०० माणसे मरण पावली असावीत, असा माझा अंदाज आहे.
या भूकंपाने पूर्व तुर्कस्तानात धुडगूस घातला. ९० टक्के घरे व इमारती जमीनदोस्त झाल्या आणि कच्च्या स्वरूपाचे दळणवळण पार उद्ध्वस्त झाले. दूरवरच्या खेड्यांतून भूकंपाचे फारसे वृत्त काही ऐकू येत नाही. पूर्व तुर्कस्तानमधील सर्व लष्करी गॅरिसनमधील सैनिक या भूकंपग्रस्त भागाकडे जात आहेत. एकूण चार प्रांतांत भूकंप झाला आहे.(२१ ऑगस्ट, १९६६)