लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नॅशनल स्टुडंट्स यूनियन ऑफ इंडिया ( एनएसयूआय ) सहित युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. या वेळी ‘ अभाविप ’च्या कार्यकर्त्याला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी ‘एनएसयूआय’ व युवक काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पुष्कर आबनावे, भूषण रानभरे, अक्षय जैन, सौरभ अमराळे, प्रथमेश आबनावे, सागर धाडवे यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरोधात ‘अभाविप’चे कार्यकर्ते मल्हार नीलेश पाटील (वय १९, रा. औंध) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी ‘एनएसयूआय’चे कार्यकर्ते विद्यार्थिनींवर दबाब आणत असल्याचा आरोप ‘अभाविप’ने केला. या विरोधात ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी ‘सीओईपी’ कॉलेजच्या वसतिगृह परिसरात जमून घोषणाबाजी केली; तर राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास इच्छुक विद्यार्थिनींना ‘अभाविप’कडून धमकावले जात असल्याचा आरोप ‘एनएसयूआय’ने केला. या वेळी मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाच्या वसतिगृह परिसरात ‘अभाविप’ आणि ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावादीच्या घटनेनंतर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी चार दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) डॉ. प्रशांत अमृतकर यांनी हे आदेश काढले आहेत. त्यानुसार, विद्यापीठ आणि वसतिगृह परिसरात राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेत्यांना येण्यास, उपोषण, निदर्शने, मोर्चे, रॅली किंवा बैठका घेण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश २६ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत.