Emphasis On Enhancing The Quality Of School Textbooks
दर्जेदार पाठ्यपुस्तकांची निर्मिती करा
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
शैक्षणिक वर्ष २०२७-२८पासून इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत. त्यानुषंगाने कार्यशाळेत विचारमंथन झाले. पाठ्यपुस्तक लेखनाशी संबंधित अधिकारी, तज्ज्ञ आणि लेखकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदलत्या शैक्षणिक गरजा, क्षमताधिष्ठित शिक्षण पद्धती आणि आधुनिक अध्यापनाच्या दृष्टिकोनाची माहिती देण्यात आली. विद्यार्थिकेंद्रित, गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधिष्ठित पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजातील व्यक्ती, इतिहास, गणित, शास्त्र, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, नागरी संरक्षण आणि वाहतूक सुरक्षा आदी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
‘जुनी पाठ्यपुस्तके दिग्गज लेखकांनी निर्माण केली आहेत. तुम्हालाही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवायचे आहे. ‘एआय’च्या काळात सर्जनशीलता टिकवून पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणे गरजेचे आहे. भावी पिढीसाठी दर्जेदार अभ्यासक्रम तयार करण्याचे गांभीर्य प्रत्येकाने लक्षात घ्यावे. नियोजनबद्ध पद्धतीने आणि वेळेच्या मर्यादेत हे काम पूर्ण करायचे आहे,’ अशी अपेक्षा बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी व्यक्त केली.बालभारतीतर्फे आयोजित दोनदिवसीय पाठ्यपुस्तक निर्मिती कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्ये, मूल्ये आणि विषयज्ञान विकसित करणारी गुणवत्तापूर्ण पाठ्यपुस्तके तयार करण्याच्या उद्देशाने शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अद्ययावत शैक्षणिक धोरणाचे पाठ्यपुस्तकांमध्ये रूपांतर करण्यासाठी ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरली, असे ओक यांनी सांगितले. कार्यशाळेदरम्यान बालभारतीच्या जुन्या पोस्टर्स आणि दुर्मीळ पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात आले. त्यातून तज्ज्ञांना यापूर्वीच्या लेखकांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली. या वेळी सुकाणू समितीचे सदस्य; तसेच समांतर सत्रांमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांचा अनुराधा ओक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन वर्षा सरोदे यांनी केले. वित्त व लेखा अधिकारी शुभांगी माने उपस्थित होत्या.