विद्यार्थ्यांमध्ये असंतोष

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
विद्यार्थ्यांमध्ये असंतोष
जयपूर : अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षेदरम्यान सत्यसाई पीजी कॉलेजमध्ये शनिवारी वीजपुरवठा वीस मिनिटे खंडित झाला. त्यामुळे या केंद्रावरील १९२ पैकी ४९ विद्यार्थ्यांना ही संगणकाधारित परीक्षा पूर्ण करता आली नाही. परीक्षा पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सप्टेंबरला फेरपरीक्षा घेण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) केली.

‘नीट’ पेपरफुटीवरून दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांतही विद्यार्थी-उमेदवारांमध्ये असंतोष कायम आहे. बिहारमध्ये भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी लोकभवनावर मोर्चा काढणारे आंदोलक आणि पोलिस यांच्यात शनिवारी पाटण्यात झटापट झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला; तसेच काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाटणा येथील आर गोलंबर येथे बॅरिकेड लावले होते. आंदोलकांनी बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करताच आंदोलक आणि पोलिस यांच्यात धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला. परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, असे शहराच्या (मध्य) पोलिस अधीक्षक ममता कल्याणी यांनी सांगितले. सरकारने २४ ऑगस्टपर्यंत आमच्याशी चर्चा न केल्यास २५ ऑगस्टला बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. बिहार बंदचा इशारा काहींनी दिला.

‘भरती परीक्षा रद्दच्या निर्णयाचा उच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बचाव करण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारने विश्वासघात केला,’ असा आरोप आंदोलकांनी केला.