ऐन सणासुदीतसाखर महागली

Contributed byा,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स
ऐन सणासुदीतसाखर महागली
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
चहाच्या कपापासून मोदक-लाडवांपर्यंत रोजच्या वापरातील साखरेने आता खिशाला चटका देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिनाभरात देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून, घाऊक दर प्रतिकिलो ५५ ते ५८ रुपयांवर, तर किरकोळ दर ६५ ते ८० रुपयांवर पोहोचले आहेत. आगामी सणासुदीच्या काळात मागणी वाढण्याची शक्यता असल्याने पुरवठा अपुरा पडण्याची चिंता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी द्यावी, अशी मागणी द बॉम्बे शुगर मर्चंट्स असोसिएशनने केंद्र सरकारकडे केली आहे.

सणासुदीची चाहूल लागताच घराघरांत गोडधोडाची तयारी सुरू होते. मात्र, यंदा मोदक, लाडू, पेढ्यातील गोडवा वाढण्याआधीच साखरेच्या किमतीने उडी घेतली आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारातील दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील बजेटवर होऊ लागला आहे.
मिठाईचे भाव

वाढण्याची शक्यता

साखरेच्या वाढत्या दराचा फटका मिठाई व्यावसायिकांनाही बसत आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, बेकरी उत्पादने आणि फराळाच्या पदार्थांसाठी साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे सध्याची दरवाढ कायम राहिल्यास मिठाईच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. ‘ साखरेचे भाव असेच वाढत राहिले आणि लवकर कमी झाले नाहीत, तर मिठाईचे भाव वाढवावे लागतील, असे विक्रेत्याने सांगितले. वेळेत आयात झाल्यास साखरेचा पुरवठा वाढेल, असा विश्वास असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केला आहे.

दरवाढीच्या पार्श्वभूमीवर द बॉम्बे शुगर मर्चंट्स असोसिएशनने अन्न व सार्वजनिक वितरण विभागाला पत्र लिहिले आहे. तीस नोव्हेंबरपर्यंत कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी द्यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. बहुतांश साखर कारखान्यांकडे आधुनिक शुद्धीकरण सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आयात कच्च्या साखरेचे नियमित गाळप हंगामासोबतच शुद्धीकरण करणे शक्य आहे, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. कच्च्या साखरेची शुल्कमुक्त आयात हा तांत्रिकदृष्ट्या कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य पर्याय ठरू शकतो, असा दावा असोसिएशनने केला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या साखरेचे दर भारतीय साखर कारखान्यांसाठी व्यवहार्य पातळीवर असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.