नेपाळमध्ये ३८४ प्रवासी बेपत्ता

Contributed byकाठमांडू|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नेपाळमध्ये ३८४ प्रवासी बेपत्ता
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात पुरामुळे एकूण ३८४ प्रवासी बेपत्ता झाले असून, त्यात २९१ विदेशी आणि ९३ नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. त्याशिवाय ४४ नेपाळ लष्करी जवानांसह ८० सुरक्षा जवान विविध ठिकाणांहून बेपत्ता झाले आहेत, तर पर्यटकांमध्ये १०५ भारतीय, ३७ अनिवासी भारतीय आणि उर्वरित अमेरिका, मलेशिया, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व नेदरलँड्समधील पर्यटक असल्याचे नेपाळ पर्यटन मंडळाने (एनटीबी) म्हटले आहे. यातील ५९ भारतीय तिबेटमधील कैलास-मानसरोवर यात्रेसाठी निघाले होते. पर्यटन मंडळाने मदतीसाठी १२३४ हा टोल फ्री आपत्कालीन क्रमांक किंवा ११४४ ही हॉटलाइन अथवा ९८५१२८९४४५ हा पर्यटक पोलिस क्रमांकही जारी केला आहे.

पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर, बचाव आणि मदतकार्य पार पाडण्यासाठी प्रभावित भागांमध्ये नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यानुसार बाधित भागांत शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. लष्कराने बचावकार्यासाठी १२ हेलिकॉप्टर तैनात केले. रसुवा जिल्ह्यातील स्याफ्रुबेसीतून सहा जणांना, मैलुंगमधून दोन आणि धुंचेमधून चार जणांना वाचवण्यात आल्याचे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, रसुवा, नुवाकोट, धाडिंग आणि चितवन यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये ‘हाय ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेल्या वर्षीही भोटेकोशीला दोन विनाशकारी पुरांचा तडाखा बसला होता.
पूल, घरे क्षणार्धात गेली वाहून

पुरा तडाखा इतका जोरदार होता की नदीतील एका भव्य पुलासह घरे व इतर मालमत्ता काही सेकंदात वाहून गेल्या. सोशल मीडियावर शेअर झालेल्या एका व्हिडीओमध्ये पुराचे गढूळ पाणी सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि घरे वाहून नेताना दिसत आहे, तर एका व्हिडीओमध्ये एक घर कलंडून शेजारच्या इमारतीवर पडताना व या दोन्ही वास्तू पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या.

बिहार, उत्तर प्रदेशला धोका

पाटणा : नेपाळमधील अनेक जिल्ह्यांत बुधवारी आलेल्या अचानक पुरामुळे शेजारील बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यांना धोका निर्माण झाला आहे. प्रामुख्याने बिहारला याचा जास्त फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.