‘एआय’ युगासाठी माणूस तयार नाही

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
‘एआय’ युगासाठी माणूस तयार नाही
‘माणूस अद्याप एआयसाठी तयार नाही. त्यामुळे केवळ सायबर हल्ले आणि डीपफेकचा धोका वाढणार नाही, तर नोकरीच्या बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या तरुणांना सुरुवातीच्या संधी मिळणेही बंद होऊ शकते,’ असा इशारा ‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे.

‘एआय’मुळे जगभरातील कोट्यवधी नोकऱ्या नष्ट होऊ शकतात. याचा सर्वाधिक फटका तरुण पिढीला बसण्याची शक्यता आहे, असेही गेट्स यांनी नमूद केले. ‘द टर्ब्युलंट एआय एरा इज हिअर’ या ब्लॉग पोस्टमध्ये गेट्स यांनी म्हटले आहे, की ‘एआय’मुळे होणाऱ्या या वेगवान बदलांसाठी जगाने तातडीने तयारी सुरू करायला हवी. हा बदल केवळ रोजगारावरच नव्हे, तर सरकारे, व्यवसाय आणि मानवी नातेसंबंधांवरही परिणाम करणारा ठरणार आहे.
गेट्स यांच्या मते, ‘एआय’चा काळ हा मानवाच्या इतिहासातील सर्वांत उलथापालथ करणारा टप्पा आहे. पूर्वी तांत्रिक बदल घडून येण्यासाठी शतके लागत असत; मात्र एआयमुळे पुढील १० वर्षांतच अनेक मोठे उद्योग पूर्णपणे बदलून जातील. देशोदेशीच्या सरकारांनी वेळीच योग्य धोरणे आखली नाहीत, तर भविष्यात नव्या नोकऱ्या फारच कमी निर्माण होतील आणि बेरोजगारी झपाट्याने वाढेल, असेही ते म्हणाले.

तरुणांसाठी करिअर कठीण

गेट्स यांच्या मते, ‘एआय’च्या आगमनामुळे तरुणांचे सर्वाधिक नुकसान होईल. भविष्यात कंपन्यांमधील प्राथमिक स्तरावरील कामे एआय स्वतः करू लागेल. त्यामुळे नव्या रिक्त जागांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत तरुणांसाठी करिअरची सुरुवात करणे अत्यंत कठीण होईल.