स्कूल व्हॅनचालकाचाभुयारी मार्गातून प्रवास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
स्कूल व्हॅनचालकाचाभुयारी मार्गातून प्रवास
देवास : मध्य प्रदेशातील देवास शहरात पाण्याने भरलेल्या रेल्वे भुयारी मार्गातून स्कूल व्हॅन नेत चालकाने धोकादायक प्रवास केला. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. या घटनेचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

‘आरटीई’चे लाभार्थी सांगा
प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पाच वर्षांची शाळानिहाय माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यात ज्या मुलांचे प्रवेश नाकारले गेले किंवा शाळांनी ज्यावर कारवाई केली नाही अशा मुलांच्या तपशीलाचाही समावेश आहे. बभनौती, पचवाल येथील सेंट जॉन्स स्कूलने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. विनोद दिवाकर यांनी हा आदेश दिला.

इराणींना अमेठीचे वेध

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळालेल्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील पक्षनेत्यांसोबत बैठक घेतली. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत इराणी यांनी राहुल गांधी यांचा अमेठीतून ५५ हजारपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. मात्र, २०२४ मध्ये त्या काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा यांच्याकडून दीड लाखांहून अधिक मतांनी पराभूत झाल्या होत्या.

मुदतबाह्य अन्नपदार्थ नष्ट

नवी दिल्ली : दिल्लीतील अन्न सुरक्षा पथकांनी दूध उत्पादने आणि मिठाईचे ३७ नमुने गोळा केले. तसेच सणासुदीपूर्वी मिठाईची दुकाने, उत्पादन युनिट्स व भाजी मंडईंची तपासणी करत सुमारे १३१ किलो मदतबाह्य अन्नपदार्थ नष्ट केले. ओखला सब्जी मंडी आणि घंटा घर सब्जी मंडीसह ओखला, बडली, निहाल विहार आणि नरेला येथील मिठाई उत्पादन युनिट्समध्ये तपासणी करण्यात आली.

महिलेची बदनामी

हैदराबाद : अज्ञात व्यक्तींनी एका लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीचे फोटो आणि व्हिडीओ मॉर्फ करून ते सोशल मीडियावर प्रसारित केला. या प्रकरणी तेलंगण पोलिसांनी येथे गुन्हा दाखल केला. संबंधित फोटो आणि व्हिडीओ त्या महिलेच्या सोशल मीडिया खात्यावरून घेण्यात आले होते आणि गेल्या वर्षभरात ते मॉर्फ करून प्रसारित केल्याचा आरोप आहे.

बेपत्ता मच्छिमार सापडले

अमरावती : बंगालच्या उपसागरात बेपत्ता असलेले आंध्र प्रदेशातील सात मच्छिमार सापडले. त्यांच्या बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने हे मच्छिमार पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पोहोचले. तेथून त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री के. अच्चन्नायडू यांनी सांगितले.