नेपाळला बसलेल्या पुराचा तडाखा इतका जोरदार होता की, नदीतील एका भव्य पुलासह घरे व इतर मालमत्ता काही सेकंदात वाहून गेल्या. सोशल मीडियावर शेअर झालेल्या एका व्हिडीओमध्ये पुराचे गढूळ पाणी सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि घरे वाहून नेताना दिसत आहे, तर एका व्हिडीओमध्ये एक घर कलंडून शेजारच्या इमारतीवर पडताना व या दोन्ही वास्तू पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसत आहे. अन्य एका व्हिडीओमध्ये पुलाचा एक भाग वाहून जाताना दिसत आहे. त्याआधी हा पूल मधूनच तुटल्याचे दिसत आहे.
पूरग्रस्त भागातून आत्तापर्यंत ९५ मृतदेह बाहेर काढण्यात आले. यापैकी १८ चितवन जिल्ह्यातून, १६ धाडिंगमधून, ११ नुवाकोटमधून आणि एक मृतदेह रासुवामध्ये सापडल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘बाधित क्षेत्रांतील विविध भागांतून किमान १०० जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी ३० जण काठमांडू येथील त्रिभुवन युनिव्हर्सिटी टीचिंग रुग्णालयातून उपचार घेत आहेत’, असे अधिकाऱ्याने नमूद केले. अचानक आलेल्या या पुरामुळे रासुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि नजीकच्या स्याफ्रुबेसी भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असून वाहने, वस्तू आणि इतर मालमत्ता वाहून गेल्याचे नेपाळ लष्कराने निवेदनात म्हटले आहे. तसेच, नुवाकोट आणि रासुवा जिल्ह्यांतील एकूण ३५४ मेगावॉट क्षमतेचे आठ जलविद्युत प्रकल्प आणि बांधकामाधीन पाच प्रकल्पांचे नुकसान झाल्याची माहिती ‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन नेपाळ’कडून (आयपीपीएएन) देण्यात आली. धाडिंग जिल्ह्यातील गजुरी येथील एक पूलही पुरामुळे वाहून गेला.पुरामुळे २९१ विदेशी आणि ९३ नेपाळी नागरिक बेपत्ता झाले. त्याशिवाय ४४ नेपाळ लष्करी जवानांसह ८० सुरक्षा जवान विविध ठिकाणांहून बेपत्ता झाले आहेत, तर पर्यटकांमध्ये १३३ भारतीय, ३७ अनिवासी भारतीय आणि उर्वरित अमेरिका, मलेशिया, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व नेदरलँड्समधील पर्यटक असल्याचे नेपाळ पर्यटन मंडळाने (एनटीबी) म्हटले आहे. यातील ५९ भारतीय तिबेटमधील कैलास-मानसरोवर यात्रेसाठी निघाले होते. पर्यटन मंडळाने मदतीसाठी १२३४ हा टोल फ्री आपत्कालीन क्रमांक किंवा ११४४ ही हॉटलाइन अथवा ९८५१२८९४४५ हा पर्यटक पोलिस क्रमांकही जारी केला आहे.
पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर, बचाव आणि मदतकार्य पार पाडण्यासाठी प्रभावित भागांमध्ये नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यानुसार बाधित भागांत शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. लष्कराने बचावकार्यासाठी १२ हेलिकॉप्टर तैनात केली. रासुवा जिल्ह्यातील स्याफ्रुबेसीतून सहा जणांना, मैलुंगमधून दोन आणि धुंचेमधून चार जणांना वाचवण्यात आल्याचे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे.
‘हाय ॲलर्ट’ जारी
दरम्यान, रसुवा, नुवाकोट, धाडिंग आणि चितवन यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये ‘हाय ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेल्या वर्षीही भोटेकोशीला दोन विनाशकारी पुरांचा तडाखा बसला होता. यामुळे रासुवामध्ये प्रचंड हाहाकार माजला होता व किमान १० जणांचा मृत्यू झाला होता.