पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील एका रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात बुधवारी लागलेल्या भीषण आगीत १४ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. इस्लामाबादमधील सर्वांत मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या रुग्णालयाच्या माता आणि बाल विभागाच्या तिसऱ्या मजल्यावरील कक्षास सकाळी अचानक आग लागली. त्यावेळी दोन डॉक्टर, दोन परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचारी कार्यरत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. यावेळी या कक्षात एकूण १५ नवजात अर्भके होती. त्यातील केवळ एका बालकास वाचवण्यात यश आले. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली.