New Voice 18 Villagers Acquitted In Tiger Attack Case
सहा वर्षांनी १८ गावकरी निर्दोष
Contributed by: यवतमाळ|महाराष्ट्र टाइम्स•
राळेगाव आणि केळापूर तालुक्यात सहा वर्षांपूर्वी धुमाकूळ घातलेल्या नरभक्षक अवनी टी-१ वाघिणीच्या मानवी बळींमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शासकीय वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी राळेगाव तालुक्यातील तीन गावांतील १८ ग्रामस्थांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले होते. यातील सर्व ग्रामस्थांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
देवीदास सरदार जाधव, सुभाष देवीदास जाधव, दिलीप देवीदास जाधव, मधुकर तुकाराम आडे, धनराज तेता राठोड, विजय डोमा राठोड, कैलास दसरू आडे] प्रकाश गोपाळ उमरे, रवींद्र महादेव गलांडे, कपिल लक्ष्मण भगत, पवन अंकुश भगत, प्रभाकर सुभाष लढे, विश्वजित सुधाकर कोरडे] सुहास आनंदराव ठाकरे, चरणदास पांडुरंग दूधकोहळे, हुसेन बापूराव खोरद, वाल्मीक तानबाजी काटसरपे, मोहन चिंतामण ठाकरे अशी ग्रामस्थांची नावे आहेत. १३ बळी घेतलेल्या नरभक्षक अवनी वाघिणीच्या हल्ल्यांमुळे तीन गावांतील गावकरी दहशतीत होते. १६ सप्टेंबर २०१७ रोजी वाघिणीने एका युवकावर हल्ला करून त्याला ठार केले. त्यामुळे राज्य शासनाचे वाहन गावात येताच ते वनाधिकाऱ्यांचे असल्याचा गावकऱ्यांचा समज झाला. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी शासकीय वाहनाची तोडफोड केली. याबाबत राळेगाव पोलिस ठाण्यात १८ ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.